सर्च इंजिन गुगलचा प्रवास २७ सप्टेंबरला १९९८ मध्ये सुरू झाला होता आणि या प्रवासाला २७ सप्टेंबर २०२३ ला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. गुगल नेहमीचं प्रत्येक सणांदरम्यान किंवा एखादा खास दिवस असेल तर (Doodle) डूडल बनवतो आणि दिवस आणखीन खास करतो. तर गुगलने स्वतःच्या २५ व्या वाढदिवसानिमित्तसुद्धा खास डुडल तयार केले होते, ज्याची बरीच चर्चा रंगली होती. तर आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलचा २५ वा वाढदिवस कसा साजरा केला याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुंदर पिचाई हे भारतीय वंशांचे उद्योगपती व गुगलचे मुख्य अधिकारी म्हणजेच सीईओ (CEO) आहेत; तर सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलचा २५ वा वाढदिवस साजरा केला आहे आणि त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. गुगलच्या वाढदिवसासाठी गुगलचे सर्व कर्मचारी एकत्र आलेत. सगळ्यात आधी एका हॉलमध्ये सुंदर पिचाई गुगलच्या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच २५ व्या वाढदिवसासाठी तयार करण्यात आलेलं डुडलचं पोस्टर हॉलवर चिपकवण्यात आलं आहे आणि खास गोष्ट अशी की, सर्व कर्मचाऱ्यांनी डोक्यावर रंगीबेरंगी टोप्या घातल्या आहेत. गुगलचा २५ वा वाढदिवस कसा साजरा केला एकदा तुम्हीसुद्धा या पोस्टमधून बघाच..
पोस्ट नक्की बघा :
असा साजरा झाला गुगलचा २५ वा वाढदिवस :
सुंदर पिचाई यांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोत गुगलच्या वाढदिवसासाठी तीन थरांचा केक आणि त्यावर वर्तुळात पंचवीस असे लिहिण्यात आले आहे. दुसऱ्या फोटोत अनेक कर्मचारी गुगलसाठी खास पोस्टर हातात घेऊन, तर काहीजण पोज देत उभे आहेत. तिसऱ्या फोटोत गुगलसाठी बर्फापासून शोपीस बनवण्यात आले आहे, ज्यात २५ हा अंक कोरला आहे. चौथ्या फोटोत २५ आणि डुडल यांचे चित्र लावलेले कपकेक वर्तुळाकार रचनेत ठेवण्यात आले आहेत. तसेच सर्व कर्मचारी हा क्षण अगदीच आनंदात साजरा करताना दिसून येत आहेत आणि अशा खास पद्धतीने गुगलचा पंचविसावा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
वाढदिवसाची खास पोस्ट सुंदर पिचाई यांनी @sundarpichai यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘वाढदिवसाची पार्टी आणि कपकेकशिवाय वाढदिवस साजरा होत नाही, आमचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जगभरातील Googlers कर्मचारी एकत्र आले हे पाहून आनंद झाला’, असे कॅप्शन सुंदर पिचाई यांनी पोस्टला दिले आहे.