Lucy Wills Google Doodle : गुगलने डूडलद्वारे इंग्लंडच्या लुसी विल्स यांना मानवंदना दिली आहे. त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल केले आहे. लुसी विल्स या बिमेचोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध होत्या. महिला गर्भवती होताना रक्ताचे प्रमाण कमी असल्यामुळे होणारे आजार आणि त्यावरील उपचाराच्या शोधासाठी लुसी विल्सला जगभरात ओळखले जाते. लुसी विल्सचा हा शोध जगभरातील महिलांसाठी वरदान मानला जातोय.
लुसी यांचा जन्म १८८८ मध्ये इंग्लंडमध्ये झाला होता. १९११ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून बॉटनी आणि जिओलॉजी विषयातून पदवी घेतली. त्यानंतर लुसी विल्स यांनी भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळे लुसी यांचे भारताशीदेखील वेगळे नाते होते. भारत दौऱ्यावर असताना लुसी विल्स यांनी मुंबईतील कापड गिरणीत काम करणाऱ्या गरोदर महिलांच्या अॅनेमियाची तपासणी केली. त्यामागील कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी संशोधन केले. त्या चिकित्सेदरम्यान महिलांना पुरेस पौष्टिक आहार मिळत नसल्यामुळे या गरोदर महिलांना मॅक्रोसायटिक अॅनिमियासारखा गंभीर आजार होत असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर लुसी यांनी उपाय शोधण्यासाठी अनेक वेगवेळे प्रयोग केले. उंदीर व माकडांवर केलेल्या त्यांच्या प्रयोगाला यश आले. त्यानंतर लुसी यांचा हा प्रयोग जगभरातील महिलांवर वापरण्यात येऊ लागला. काही कालावधीनंतर या प्रयोगाला विल्स फॅक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. गरोदर महिलांसाठी फॉलिक अॅसिडचा वापर हा आता सामान्य झाला आहे. त्याशिवाय प्रसूतिपूर्व अॅनिमिया रोखण्यासाठी लोह आणि व्हिटॅमिन बी १२ चा वापर केला जातो.
लुसी विल्स यांनी आपले आयुष्य गरोदर महिलांचे आरोग्य आणि आहार या संशोधनासाठी वाहून घेतले. १६ एप्रिल १९६४ रोजी लुसी यांचे निधन झाले होते.