Google Celebrate Republic Day 2025 With Wildlife parade : भारतात दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या उत्साहात ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. यावर्षी भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) सोहळ्यासाठी देश सज्ज झाला आहे. शाळा, महाविद्यालयांपासून ते सरकारी कार्यालयांपर्यंत प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सगळ्यात गूगलसुद्धा प्रजासत्ताक दिनासाठी एक खास गोष्ट घेऊन आला आहे. गूगलने डूडल थीममध्ये “GOOGLE” च्या अक्षरांसह वन्यजीव परेड दाखवली आहे.
तुम्ही मोबाइल किंवा लॅपटॉपवर गूगल ॲप चालू केल्यावर तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2025) खास डूडल तयार केलेले दिसेल. या डूडलमध्ये लडाखमधील पारंपरिक पोशाखात तयार होऊन रिबन धरलेला बिबट्या, धोती-कुर्ता परिधान केलेला वाघ पारंपरिक वाद्य वाजवताना दाखवला आहे. इतर प्राण्यांमध्ये उड्डाण करताना मोर, औपचारिक पोशाख घातलेला काळवीट, कोल्हा, खारुताई, मगर यांचासुद्धा या डूडलमध्ये समावेश करण्यात आला आहे; जो भारताच्या विविध संस्कृतीचे प्रतीक आहे.
भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025)
गूगलच्या म्हणण्यानुसार, गूगल डूडलमध्ये चित्रित केलेले परेडमधील प्राणी देशाच्या विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांची विविधता, एकता अधोरेखित करतात. त्याचबरोबर डूडलसहित कॅप्शन लिहिले आहे की, हे खास डूडल भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे, जो राष्ट्रीय अभिमान, एकतेने चिन्हांकित आहे. हे गूगल डूडल पुण्यात राहणाऱ्या रोहन दाहोत्रे यांनी तयार केले आहे. दाहोत्रे यांनी व्यक्त केले की, प्रजासत्ताक दिन भारतातील लोकांना एकत्र आणून त्यांच्यातील देशभक्तीची भावना वाढवणे आहे. डूडलनिमित्त भारताचे स्वतःचे एक दोलायमान जग म्हणून वर्णन करून त्यांनी देशातील विलक्षण विविधता, त्याच्या असंख्य भाषा, संस्कृती आणि परंपरांवर हे अधोरेखित केले आहे.
दरवर्षी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे प्रतिष्ठित परेडसह हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावरील सोहळा आपण टीव्हीवर लाईव्ह किंवा तिकीट बुक करून पाहू शकतो. तर यंदा गूगलनेसुद्धा हीच गोष्ट लक्षात ठेवून विविध पोशाख, संस्कृती आणि भाषांचे मेळ दाखवणारे एक खास डूडल तयार केले आणि “GOOGLE” च्या अक्षरांसह ‘वन्यजीव परेड’ चित्रित केली आहे, जी पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.