देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाला समोरे जावे लागल्यानंतर या पराभवाची कारणमीमंसा वेगवेगळ्या स्तरावर केली जात आहे. यापैकी एक कारण दिले जात आहे राम मंदिर मुद्दा. विकास कामांबद्दल बोलण्याऐवजी राम मंदिरसारखा मुद्दा निवडणुकांच्या तोंडावर नव्याने उपस्थित केल्याने तसेच साडेचार वर्षात राम मंदिरासाठी प्रयत्न न केल्याने भाजपाचा पराभव झाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटताना दिसत आहे. एकीकडे राम मंदिरावरून जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीकडे गुगल मॅप्सवर नेटकऱ्यांनी वादग्रस्त रामजन्मभूमीवर ‘मंदिर यही बनेगा’चा टॅग केल्याची दिसून आले आहे. त्यामुळे आता राम मंदिरसमर्थकांनी ही ऑफलाइन मागणी ऑनलाइनवर केवळ चर्चांच्या स्तरावर न ठेवता अगदी मंदीर कुठे बांधणार याबद्दल थेट गुगल मॅप्सवरूनच दावा केला आहे.
कुठेही भटकंतीला जायचे असेल किंवा एखादा पत्ता शोधायचा असेल तर सर्वात उत्तम आणि खात्रीशीर उत्तर म्हणजे गुगल मॅप्स. आजच्या स्मार्टफोनच्या युगामध्ये गुगल मॅप्सला बरेच महत्व प्राप्त झाले आहे. अनेकजण या मॅप्सचा वापर अगदी दैनंदिन जीवनामध्ये करताना दिसता. मात्र सध्या गुगल मॅप्स एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ते कारण म्हणजे आयोध्येच्या गुगल मॅपवर दिसत असणारा ‘मंदिर यही बनेगा’ हा टॅग. जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गुगल मॅप्सवरच थेट मंदिर यही बनाऐंगेचा नारा राम मंदिर समर्थकांनी दिला आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता या मागणीला पाठिंबा देणाऱ्यांनी थेट गुगल मॅपवर विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर मागणीसाठी वापरलेल्या ‘मंदिर यही बनाऐंगे’ या घोषवाक्यावरून गुगल मॅपवर ‘मंदिर यही बनेगा’ टॅग तयार करुन तो वादग्रस्त जागेवर मॅपमध्ये मार्क केला. मात्र अनेकांनी हा टॅग उपयोगाचा नसल्याचे सांगितल्याने गुगलने तो काढून टाकला आहे.
गुगल मॅपवर राम जन्मभूमी सर्च केल्यानंतर नकाशामध्ये ‘मंदिर यही बनेगा’चा टॅग दिसत होता. विशेष म्हणजे ६ डिसेंबर १९९२ साली बाबरी मशिद पाडण्यात आली त्याच जागेवर हा टॅग मार्क करण्यात आला होता. मागील दोन दशकांपासून अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधावे अशी मागणी वेळोवेळी केली आहे. भगवान राम यांचा जन्म याच ठिकाणी झाल्याचे या हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.
‘मंदिर यही बनेगा’ हा टॅग मंदिर म्हणजेच धार्मिक स्थळ या कॅटेगरीमध्ये मॅपवर मार्क करण्यात आला होता. याबद्दल नेटवर बरीच चर्चा झाल्यानंतर अनेकांनी मॅपवर जाऊन हा टॅग उपयोगाचा नसल्याचे मार्क केल्याने गुगलने तो काढून टाकला आहे. याबद्दल बोलतना गुगलने अनेकांनी हा टॅग उपयोगाचा नसल्याचे मार्क केल्याने तो आम्ही काढून टाकल्याचे म्हटले आहे. स्थानिकांनी त्यांच्या परिसरातील माहिती गुगलच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन द्यावी यासाठी खूप प्रयत्न करत आहोत. अनेकदा युझर्सच मॅपवर जवळची ठिकाणे टॅग करतात. पण काहीजण याचा गैरफायदा घेत लोकांना उपयोगाचे नसणाऱ्या जागा टॅग करतात. असे होते तेव्हा आम्ही या टॅग केलेल्या गोष्टी मॅपवरून लवकरात लवकर काढून टाकण्याचा प्रयत्न करतो अशी माहिती गुगलच्या प्रवक्त्यांनी दिली. सध्या राम मंदिर प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.