Why Is Google Grey: गुगल डूडलच्या माध्यमातून आपण आजवर अनेकदा भन्नाट कल्पना पाहिल्या आहेत. रंग, कलाकुसर व हटके संकल्पना नेहमीच गुगलच्या वापरकर्त्यांना भुरळ पाडतात. पण आज गूगलचा रंग बदलून राखाडी ठेवण्यात आला आहे. गूगलने अचानक मोनोक्रोम लोगो केल्याचे पाहून वापरकर्ते गोंधळून गेले आहेत काहींना तर कदाचित आपल्या नेटवर्कची समस्या आहे का असाही प्रश्न पडला होता. शक्यतो जेव्हा गूगलच्या लोगो मध्ये डूडल असल्यास त्यावर क्लिक करून लगेचच त्याविषयी माहिती मिळवता येते पण या राखाडी लोगोवर क्लिकही करता येत नाही. वापरकर्त्यांचे प्रश्न पाहून गूगलने स्वतः याबाबत माहिती देत कारण स्पष्ट केले आहे.
गूगलने राखाडी रंगाचा लोगो हा इंग्लंडच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहण्यासाठी तयार केला आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे गुरुवार, ८ सप्टेंबरला ९६ व्या वर्षी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. जगभरातील राजकीय नेते, सेलिब्रिटी व नागरिकांकडून महाराणींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गूगलचा रंग पाहून नेटकरी म्हणतात…
गूगलचे मुख्य कार्यकारी सुंदर पिचाई यांनी सांगितले की, अनेक वृत्तपत्रांनी राणीचे वर्णन “एकत्रित शक्ती” म्हणून केले आहे ज्यांनी कित्येक दशके होणाऱ्या बदलांमध्ये एक स्थिर व अढळ स्थान मिळवले होते. त्यांच्या सुंदर जीवनाचे व महान कारकिर्दीचे प्रतीक म्हणून हा छोटासा बदल गूगलने केलेला आहे.
यापूर्वी सुद्धा माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू यांच्या निधनानंतर, २०१८ मध्ये बुशच्या अंत्यसंस्काराच्या वेळी, लोगो राखाडी ठेवण्यात आला होता. मेमोरियल डेच्या निमित्ताने सुद्धा युद्धात जीव गमावणार्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गूगलचा लोगो राखाडी केला जातो.