भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फमिता शेख यांची आज १९१ वी जयंती आहे. यावेळी गुगलने डूडल बनवून त्यांचा गौरव केला. फातिमा शेख यांनी समाजसुधारक ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत १८४८ मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. फातिमा शेख यांचा जन्म या दिवशी म्हणजेच ९ जानेवारी १८३१ रोजी पुण्यात झाला. त्या त्यांच्या भावासोबत उस्मानसोबत राहत होत्या. दीनदुबळ्या आणि गरीबांच्या शिक्षणाला विरोध केल्याने फुले दाम्पत्याला वडिलांनी घराबाहेर काढले तेव्हा उस्मान शेख आणि फातिमा यांनी त्यांना आश्रय दिला.
शेख यांच्या घरी स्वदेशी वाचनालयाची स्थापना झाली. इथूनच फातिमा शेख आणि फुले दाम्पत्याने समाजातील गरीब, वंचित घटक आणि मुस्लिम महिलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले.
घरोघरी जाऊन मुलांना बोलवायच्या
फातिमा घरोघरी जाऊन मुलांना आपल्या घरी अभ्यासासाठी बोलवायच्या. वंचित मुलांनी भारतीय जातिव्यवस्थेचे अडथळे पार करून वाचनालयात येऊन अभ्यास करावा अशी त्यांची इच्छा होती. फुले दाम्पत्याप्रमाणेच त्याही आयुष्यभर शिक्षण आणि समतेच्या संघर्षात गुंतल्या होत्या. या मोहिमेत त्यांना मोठ्या अडथळ्यांचाही सामना करावा लागला. समाजातील प्रभावशाली वर्गाने त्यांच्या कामात अडथळे आणले. त्यांचा छळ झाला, पण शेख व त्याच्या साथीदारांनी हार मानली नाही.