एखाद्या माणसाचा मृत्यू कधी होईल हे अचूक कोणीही सांगू शकत नाही. खरं तर तंत्रज्ञानाच्या युगात काही प्रश्नाची उत्तरं शोधण्यात अद्यापही आपल्याला यश आलेलं नाही. पण, रुग्णाच्या मृत्यूबाबात मात्र योग्य भाकीत वर्तवणं कदाचित यापुढे शक्य होणार आहे. कारण गुगलनं असं टुल तयार केलंय, ज्याच्या मदतीनं रुग्णाचे एकूण आयुर्मान समजू शकते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची माहिती पडताळून गुगलंचं हे टुल रुग्णाची वाचण्याची किंवा दगावण्याची शक्यता किती असेल याची इत्थंभूत माहिती देणार आहे.
आर्टिफिशल इंटेलिजेंसचे मुख्य अधिकारी जेफ डीन यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत या उपकरणाची माहिती दिली आहे. जेफ डीन यांचा चमू या टूलवर अधिक संशोधन करत आहे. एखादा रुग्ण रुग्णालयात आल्यानंतर त्याच्या सगळ्या माहितीची पडताळणी हे टुल करणार आहे त्याचप्रमाणे रुग्णालयात हा रुग्ण किती दिवस राहिल, तो पुन्हा कधी येईल, जर तो दुर्धर आजारानं ग्रस्त असेल तर त्याची जगण्याची शक्यता किती असेल यांसारख्या अनेक प्रश्नाची उत्तरं हे टुल देणार आहे.
काही दिवसांपूर्वी गुगलनं या टुलच्या कार्यक्षमतेचा उल्लेख आपल्या संशोधन पत्रात केला होता. कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असलेली ही महिला जगण्याची शक्यता केवळ १९% असल्याचं भाकीत या टुलनं वर्तवलं होतं, आश्चर्य म्हणजे काही दिवसांतच तिचा मृत्यूदेखील झाला होता. त्यामुळे हे टुल रुग्णाला अधिक फायदेशीर ठरणार असल्याचा गुगलचा दावा आहे.