Why 1 April Celebrated as April Fool’s Day : दरवर्षी १ एप्रिल हा जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मित्र मंडळी आणि परिवारातील लोकांची मस्करी करतात, गमतीने लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. तसेच, सर्व जण एकमेकांच्या खोड्या काढण्यासाठी आणि मजा-मस्ती करण्यासाठी उत्सुक असतात. गूगल ट्रेंडमध्येही ‘एप्रिल फूल’ हा कीवर्ड सध्या चर्चेत आहे. याबाबत अधिक जाणून घेऊ…

‘एप्रिल फुल’ डे का साजरा केला जातो?

सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये झालेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे ‘एप्रिल फूल डे’ सुरुवात झाली, असे बऱ्याच लोकांचे मत आहे. असे म्हटले जाते की, तेव्हा युरोप खंडामध्ये ज्युलियन कॅलेंडरचा वापर केला जात होता. त्यानुसार नववर्षाची सुरुवात १ एप्रिल रोजी होत असे.

जेव्हा तेरावा पोप ग्रेगरी यांनी ग्रेगोरियन कॅलेंडर नावाच्या एका नवीन कॅलेंडरची संकल्पना मांडली, त्यानुसार नवीन वर्ष १ जानेवारीपासून सुरू होईल, असा प्रस्ताव त्याने मांडला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली. हे नवे कॅलेंडर वापरणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला. त्यानंतर युरोपभर ग्रेगरियन कॅलेंडरबद्दल प्रसार करण्यात आला.

परंतु, काही लोकांना ते बदलायचे नव्हते. अनेकांनी हा बदल स्वीकारण्यास नकार दिला आणि ज्युलियन कॅलेंडर वापरणे सुरू ठेवले. म्हणून आख्यायिका अशी आहे की, ज्यांनी ग्रेगोरियन कॅलेंडरचे पालन केले नाही, त्यांना मूर्ख मानले गेले आणि लोक ज्युलियन कॅलेंडरचे पालन करणाऱ्या लोकांना मूर्खात काढत त्यांची थट्टा करीत होते. अशा घटना युरोपामध्ये सुरुवातीची अनेक वर्षे घडत होत्या. पुढे कालांतराने काही लोकांनी केलेल्या चुकीमुळे युरोपमध्ये ‘एप्रिल फूल डे ची प्रथा कायम झाली. कालांतराने वसाहतवादाच्या प्रभावामुळे ती संकल्पना जगभरात पसरली.

/

रोममधील या उत्सावाप्रमाणे साजरा केला जातो एप्रिल फुल डे

ब्रिटानिकाच्या मते, हे २५ मार्च रोजी होणाऱ्या रोममधील हिलेरियासारख्या (Hilaria) ऐतिहासिक उत्सवांचे सूचक आहे. हा दिवस विनोद आणि हास्याने भरलेला असतो आणि वर्षातील असा एक दिवस असतो, जेव्हा लोक जवळजवळ काहीही थट्टा करू शकतात. कारण- या दिवशी प्रत्येक गोष्ट मस्करीच्या भावनेने घेतली जाते. पण, खोड्या काढताना आणि विनोद करताना अतिरेक करणे निश्चितच योग्य नाही.

भारतात एप्रिल फुल डे का साजरा केला जातो?

भारतामध्ये हा दिवस ब्रिटिशांमुळे आला. ८०-९० च्या दशकामध्ये तरुणाईवर पाश्चिमात्य विचारांचा मोठा पगडा होता. त्या काळामध्ये आपल्या देशात ‘मदर डे’, ‘फादर डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ अशा संकल्पना उदयास आल्या. त्यांमधील एक संकल्पना म्हणजे एप्रिल फूल डे‘ होय. या दिवशी लोक एकमेकांच्या खोड्या काढून, मस्करी करून एकमेकांना मूर्ख बनवतात.

 April Fools is currently trending in Google searches (screenshot Google Trends)
आज आपण एप्रिल फूल २०२५ साजरा करत असताना, गुगल सर्चमध्ये सध्या एप्रिल फूल हा वर्ड चर्चेत आहे (स्क्रीनशॉट गुगल ट्रेंड)

विविध देशांमध्ये साजरा केला जातो हा दिवस

काही देशांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याची पद्धत आहे. फ्रान्समध्ये लहान मुले पाठीवर कागदी मासा जोडून एकमेकांच्या खोड्या काढतात. १ एप्रिलला स्कॉटलंडमध्ये ‘किक मी’ (Kick me) असा खेळ खेळला जातो. न्यूयॉर्कमध्ये १९८६ पासून ‘एप्रिल फूल डे साजरा केला जात आहे.