Google Trending Topic Nabanna Abhijan कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. या घटनेविरोधात देशभरातील डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. आता या आंदोलनामध्ये एका विद्यार्थी संघटनेनेही उडी घेतली असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर ‘नबान्ना अभिजन’ हा गूगल सर्चवरील टॉप ट्रेंडिंगच्या विषयांपैकी एक ठरत आहे.
“पश्चिम बंग छात्र समाजने (पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांची संस्था) मंगळवारी पश्चिम बंगाल राज्य सचिवालय ‘नबान्ना’च्या दिशेने आपला मोर्चा काढला. या आंदोलनाला ‘मार्च टू नबान्ना’ असे नाव देण्यात आले. परंतु, आर. जी. कर प्रकरणात न्याय मिळविण्याच्या या आंदोलनात फूट पडली. काही आयोजकांनी यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) संबंध असल्याचे सांगत माघार घेतली. सीपीआय (एम) आणि काँग्रेस यातून मागे हटले. ‘Trends.google’नुसार, मंगळवारी निषेधाच्या काही तास अगोदर १० हजारांहून अधिक वेळा ‘नबान्ना अभिजन’ या विषयाचा शोध घेण्यात आला. त्या शोधात या विषयावर १०० टक्के वाढ झाल्याचीदेखील नोंद करण्यात आली.
हेही वाचा : अॅपलचे नवे ‘सीएफओ’ भारतीय वंशाचे; कोण आहेत केवन पारेख?
पश्चिम बंगाल पोलिसांनी ‘नबान्ना अभिजन’चे वर्णन बेकायदा म्हणून केले आहे आणि मोर्चादरम्यान संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) रस्त्यावर अराजकता पसरविण्याचे ‘षडयंत्र’, असा या मोर्चाचा उल्लेख केला आहे. तसेच, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील घाटल येथील संशयित भाजपा नेत्यांचे दोन व्हिडीओ जारी केले आहेत. त्याद्वारे मोर्चात हिंसाचार भडकवण्याची योजना आखली गेली असल्याचा दावा करण्यात आला आहे.