Viral Video of Sadhguru’s 30% Diet Challenge: : सुप्रसिद्ध योगी सद्गुरू हे नेहमी आरोग्यास फायदेशीर आहार घेण्यावर भर देतात. त्यांनी सांगितलेला ‘३०% डाएट चॅलेंज’ अतिशय लोकप्रिय आहे. या चॅलेंजद्वारे संपूर्ण आहारात कमीत कमी ३०% ताज्या फळांचे सेवन करणे अपेक्षित आहे. त्यांच्या मते, फळे हे कार्यक्षमता वाढवण्यास ऊर्जा प्रदान करतात, पचनसंस्थेवरील ताण कमी करतात आणि एकूण आरोग्य सुधारतात. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो, तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आपल्याला मदत होते. फळांच्या सेवनाने आजारांचा धोका कमी होतो आणि आपल्याला दररोज अधिक ऊर्जावान वाटते.

आपण दररोज ताजी फळे का खावीत?

फळांमध्ये नैसर्गिक साखर, फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे ही मुबलक प्रमाणात असतात. फळांच्या सेवनाने लगेच ऊर्जा वाढते. सद्गुरूंच्या मते, फळे हे सर्वांत स्वच्छ अन्नांपैकी एक आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या तुलनेत फळे शरीरासाठी अधिक हलकी आणि ऊर्जावान असतात. त्यामुळे थायरॉईड, मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.

‘३०% डाएट चॅलेंज’ शरीरासाठी कसे फायदेशीर?

फळांचे सेवन वाढवणे हे चांगल्या पचनक्रियेसाठी फायदेशीर मानले जाते. पण त्याचबरोबर ते संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. सद्गुरूंनी अशा लोकांच्या कथा सांगितल्या आहेत की, ज्यांनी भरपूर प्रमाणात फळे खाऊन त्यांच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. फळे शरीरातून विषारी पदार्थ काढतात आणि शरीरातील अवयवांचे कार्य सुधारून शरीर स्वच्छ करण्यास मदत करतात. ते शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेस प्रोत्साहन देतात. यकृत व किडनीवरील ताण कमी करतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. चयापचयाशी संबंधित आजार, लठ्ठपणा आणि इतर दीर्घकालीन आजारांसाठी ‘३०% डाएट चॅलेंज’ फायदेशीर ठरू शकते.

फळे आणि मानसिक आरोग्य

सद्गुरू सांगतात की, तुम्ही कोणत्या प्रकारच्या अन्नाचे सेवन करता, यावरून तुमची कार्यक्षमता ठरते. फळे हा अधिक ऊर्जा असलेला आहार मानला जातो. फळे व्यक्तीला सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या सतर्क राहण्यास मदत करतात. आळशीपणा दूर करण्यास आणि दिवसभर सतत ऊर्जा पुरवण्यास फळे महत्त्वाची भूमिका बजावतात. फळांमधील नैसर्गिक साखरे असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

दैनंदिन आहारात फळांचा कसा समावेश करावा?

कमीत कमी ३०% फळांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. नाश्त्यात एक वाटीभर मिश्र प्रकारची फळे खावीत, प्रक्रिया केलेल्या स्नॅक्सऐवजी ताजी फळे खावीत. तसेच फळांपासून बनविलेल्या स्मूदीचे सेवन करावे. त्यामुळे निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. खूप जास्त पौष्टिक मूल्य मिळविण्यासाठी हंगामी फळांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पोषक घटकांचे जास्तीत जास्त सेवन करण्यासाठी रिकाम्या पोटी फळे खाणे हा आणखी एक प्रभावी मार्ग ठरू शकतो.