World Heart Day 2024 : आज आपण जागतिक हृदय दिन साजरा करीत आहोत. हृदयविकाराचा धोका आता वृद्ध लोकांसह तरुणांमध्येही वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या लक्षणांबाबत जागरूक असणे ही आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जागतिक हृदय दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विचारवंत (public health intellectual) डॉ. जगदीश हिरेमठ यांनी, फ्लॅव्हनॉल (flavanol) समृद्ध डार्क कोकोचे सेवन करणे मूलपेशींना (स्टेम पेशी) कार्याला प्रोत्साहन देणे आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य सुधारणे या बाबतीत फायदेशीर आहे का, या संदर्भात दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. यावेळी त्यांनी नियमित कोकोचे सेवन करण्याच्या व्यापक परिणामांबद्दल त्यांनी चालू असलेल्या दीर्घकालीन संशोधनावर प्रकाश टाकला.

मूलपेशी किंवा स्टेमसेल म्हणजे काय?

कोकोच्या सेवनामुळे मूलपेशी किंवा स्टेम सेल विकसित होतात की नाही हे जाणून घेण्याआधी आपण स्टेम सेल म्हणजे काय हे जाणून घेऊ या. काही मूलभूत पेशी ज्यांना मूलपेशी किंवा स्टेम सेल म्हणतात, त्यांच्याकडे कोणत्याही उती (टिश्यू) तयार करण्याची क्षमता असते.

डॉ. हिरेमठ यांनी स्पष्ट केले, “कोकोमध्ये काही विशिष्ट फ्लॅव्हॅनॉल असतात, जे स्टेम सेलला कार्य करण्यास मदत करतात. कोकोमध्ये मुबलक असलेले एपिकेटचिन (Epicatechin) हे रक्तप्रवाह सुधारण्याच्या आणि नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढविण्याच्या क्षमतेसाठी, स्टेम सेलच्या कार्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. त्याशिवाय त्याचा अँटिऑक्सिडंट्सयुक्त प्रभाव पेशींचे आरोग्य आणि पुनरुत्पादनास प्रोत्साहन देतो. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारणे आणि स्टेम सेल्सना त्यांची कार्ये करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कॅटेचिन व प्रोसायनिडिन हे महत्त्वाचे फ्लॅव्हॅनॉल म्हणूनदेखील ओळखले जातात.

हेही वाचा –रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे १० पदार्थ खाल्लेच पाहिजेत! जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

कोकोचे सेवन आणि आरोग्य यावर चालू संशोधन

स्टेम सेलचे कार्य आणि एकूण आरोग्य यांवर कोकोच्या सेवनामुळे होणारे परिणाम तपासणाऱ्या सध्याच्या दीर्घकालीन अभ्यासांवर डॉ. हिरेमठ यांनी चर्चा केली. फ्लॅव्हॅनॉल्स, विशेषत: एपिकेटचिनमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य, संज्ञानात्मक कार्य (विचार करण्याची क्षमता, आकलन क्षमता इ.) आणि पेशींचे पुनरुत्पादन यांवर कसा परिणाम होतो याबद्दल संशोधकांना स्वारस्य आहे. आजारांना प्रतिबंध करणे हे या संशोधनाचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने नियमित चॉकलेट सेवनामुळे एकूणच आरोग्यावर होणाऱ्या व्यापक परिणामांबद्दल सखोल अभ्यास केला जाणे आवश्यक आहे.

हेही वाचा –‘ताल’च्या क्लायमॅक्स शूटिंगपूर्वी अनिल कपूरने का घेतली होती रेकी! तज्ज्ञांकडून जाणून घ्या, रेकी म्हणजे काय?

फ्लॅव्हनॉलयुक्त कोकोच्या सेवनाचे संभाव्य तोटे आणि त्याचे सेवन कसे करावे हे समजून घ्या (Potential downsides and interactions to consider)

फ्लॅव्हनॉलयुक्त कोकोच्या सेवनाच्या संभाव्य तोट्यांबाबत सावध करताना डॉ. हिरेमठ म्हणाले की,”कोकोच्या सेवनामुळे निद्रानाश, चिंताग्रस्तपणा किंवा हृदय गती वाढणे या समस्या उद्भवू शकतात. या संभाव्यतेमुळे विशेषत: संवेदनशील व्यक्तींच्या बाबतीत म्हणजे कॅफिनमुळे त्रास होत असलेल्या व्यक्तींनी (Caffeine sensitivity) कोकोचे सेवन ही चिंतेची बाब आहे. कोकोचे जास्त सेवन केल्याने फायबर घटकांमुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्यादेखील होऊ शकते.”

कोकोचा वापर वाढविण्यापूर्वी सर्वांनीच विशेषत: आधीपासून एखादी आरोग्य स्थिती अस्तित्वात असलेल्या किंवा औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. हिरेमठ यांनी यावेळी स्पष्ट केले.

रक्त पातळ करणारी औषधे, एंटिडिप्रेसेंट्स (MAOI) आणि उत्तेजक द्रव्यांसह (सतर्कता, ऊर्जा व मानसिक फोकस वाढवणारे पदार्थ असलेली पेये) यांचे सेवन केल्यानंतर कोकोचे सेवन टाळावे, असे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त लोह शोषणात अडथळा आणण्याची कोकोची प्रवृत्ती लोहाची कमतरता असलेल्या लोकांसाठी चिंताजनक ठरू शकते.

वय, अनुवांशिकता आणि आरोग्य स्थिती

डॉ. हिरेमठ यांनी स्पष्ट केले, “कोकोच्या सेवनाचा प्रत्येक व्यक्तीचे वय, आनुवंशिकता आणि सध्याची आरोग्य परिस्थिती या घटनेनुसार वैयक्तिक प्रतिसाद प्रभावित होऊ शकतो.”

“स्टेम पेशी एकत्रित करण्याची आणि पुनरुत्पादित करण्याची शरीराची नैसर्गिक क्षमता वयानुसार कमी होते. याचा अर्थ असा होतो की, तरुण व्यक्तींमध्ये कोकोमधील फ्लॅव्हनॉलचे अधिक फायदे दिसू शकतात,” असे त्यांनी नमूद केले.

आनुवंशिक भिन्नतामुळेही व्यक्तींची चयापचय क्षमता आणि फ्लॅव्हनॉलला त्यांचे शरीर कसा प्रतिसाद देते यावर परिणामत्व अवलंबून असते.
विद्यमान आरोग्य स्थिती, जसे की हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग आणि चयापचयासंबंधी विकार या परिणामांवर प्रभाव टाकणारे महत्त्वपूर्ण घटक असू शकतात.

हेही वाचा – “कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा

जीवनशैलीच्या सवयी आणि एकूण परिणाम

डॉ. हिरेमठ यांनी, कोकोमुळे अुनुकूल परिणाम मिळावेत यासाठी तुमच्या जीवनशैली कशी आहे हेदेखील महत्त्वाचे आहे यावर जोर दिला. निरोगी जीवनशैली म्हणजे योग्य आहार, व्यायाम असेल, तर फ्लॅव्हनॉलसमृद्ध कोकोचे सेवन सकारात्मक परिणाम वाढवू शकते आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याचे फायदे कमी होऊ शकतात. त्याचे निष्कर्ष सूचित करतात की, कोकोच्या संभाव्य स्टेम सेल सक्रियपणे कार्य करण्यासाठी वैयक्तिक प्रतिसाद अन् प्रत्येक व्यक्तीनुसार लक्षणीयरीत्या बदलू शकतात.

महत्त्वाची नोंद
लेखात फ्लॅव्हनॉलसमृद्ध कोकोच्या संभाव्य फायद्यांविषयी चर्चा करताना, डॉ. हिरेमठ यांनी, हृदयविकार बरा होऊ शकतो, असा दावा केला नाही. हृदयाचे आरोग्य आणि एकूणच आरोग्यावर कोकोच्या सेवनाचा प्रभाव पूर्णपणे समजून घेण्यासाठी अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, असे सांगितले.

गुगल ट्रेंड्समध्ये Heart Day 2024 (सौजन्य – google trend)

गुगल ट्रेंड्समध्ये Heart Day 2024

World Heart Day 2024 असल्याने सध्या सोशल मीडियावर Heart आणि Heart Day 2024 हा विषय ट्रेंडिंगवर आहे. वर दिलेल्या गुगल ट्रेंड्सच्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता, गेल्या ६ तासांत १ ते २ हजाराहूंन अधिक लोकांनी यासंदर्भात सर्च केलेलं आहे. Heart Day 2024 हा विषय २५ व्या क्रमांकावर ट्रेंडींगवर आहे

टिप: हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.