ट्रॅफिक जॅम आपल्या सगळ्यांसाठीच डोकेदुखीचा विषय आहे. पण दिल्लीच्या गुरगाँव (गुरूग्राम) मध्ये लागलेल्या ट्रॅफिक जॅममुळे एका टोल बूथ कर्मचाऱ्याचा जीव बचावला. गुरगावचं ट्रॅफिक ‘कुख्यात ‘ आहे. तिथे एकदा जॅम लागला की तासन् तास तो सुटत नाही. याचा सगळ्यांनाच वैताग आहे. पण याच गोष्टीमुळे एक टोल बूथ कर्मचाऱ्याचा जीव वाचलाय. त्याला किडनॅप करत पळवून नेणाऱ्यांनी ट्रॅफिक लागल्याने त्याला वाटेतच सोडून दिल्याची घटना घडली अाहे.
इथल्या टोल बूथवर मनोज कुमार हा कर्मचारी आपलं काम करत होता. तेव्हा एका मर्सिडीज् मधून आलेल्या एकाने टोल भरायला नकार दिला. त्यावरून या ड्रायव्हरची आणि या कर्मचाऱ्याची बाचाबाची झाली. काही वेळाने हा माणूस त्याच्या गाडीतून आणखी काही जणांना घेऊन आला. सोबत टोयोटा फाॅर्च्युनरमधून आणखी १०-१५ जणं आली. या सगळ्यांनी मनोजला बंदूक दाखवत त्यांच्या गाडीत बसायला लावलं. त्याला हायवेपासून दूर निर्जन ठिकाणी नेत जबर मारहाण करण्याचा त्याचा डाव होता. कदाचित याहूनही भयानक काहीतरी झालं असतं.
हे सगळे गुंड मनोजला गाडीत कोंबत त्या टोल बूथपासून दूर नेऊ लागले. पण गुरगावच्या ट्रॅफिकमुळे त्यांना ते जमलं नाही. तोपर्यंत इतर वाहनंही त्या ठिकाणी गोळा होऊ लागली असल्याने कोणीतरी पाहील या भीतीने या गुंडांचा नाईलाज झाला. आणि त्यांनी मनोज कुमारला सोडून दिलं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पहा हा व्हिडिओ
Kherkidaula toll plaza official being beaten mercilessly near toll plaza. pic.twitter.com/4FAJ21B66C
— abhishekbehl (@abhishekbehl) February 16, 2017
या सगळ्यामध्ये मनोज कुमारला जबर मारहाण झाली ती झालीच. पण लोकवस्तीपासून दूर नेल्यावर त्याचे या गुंडांनी जे हाल केले असते ते नक्कीच टळले. त्याचा एखादवेळेस खूनही करण्यात आला असता. पण जिवावर आलं होतं ते थोडक्यावर निभावलं असंच मनोज कुमारच्या बाबतीत म्हणावं लागेल.
आणि हे सगळं कशासाठी? तर फक्त ६० रूपयांचा टोल भरावा लागू नये यासाठी. काय तो माज ! आणि काय ती गुंडगिरी!