Woman Teacher Drunk In School Viral Video : शाळेला शिक्षणाचे मंदिर आणि शिक्षकांना देव, असे म्हटले जाते. शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी शिक्षकांनीही नियम आणि शिस्त पाळून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवणे गरजेचे असते. पण, काही शाळांमध्ये शिक्षकच नियमांना बगल देत असल्याचे दिसते. राजस्थानमधील एका सरकारी शाळेतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एक शिक्षिका दारूच्या नशेत शाळेत गोंधळ घालताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकेने त्या अवस्थेत मुख्याध्यापकांची कॉलर पकडून बाहेर काढले, त्यानंतर तिने इतर शिक्षकांना धमकावले आणि सरपंचाबरोबरही गैरवर्तन केले. या घटनेचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
मुख्याध्यापकांना दिली धमकी
हे प्रकरण अलवर येथील नांगला जोगी शाळेतील आहे. जिथे शिक्षिका ममता मीना यांनी दारू पिऊन भरशाळेत चांगलाच गोंधळ घातला. इतकेच नाही, तर शिक्षिकेने मुख्याध्यापकांच्या कॉलरला पकडून शाळेतून हाकलून दिले. या व्हिडीओमध्ये ती शिक्षिका जातीयवादी विधान करताना दिसत आहे. या महिलेने गावच्या सरपंचालाही खूप खडसावले. शिक्षिकेने शाळेच्या मुख्याध्यापकांना धमकावत पंडितांच्या सर्व वर्तनाचा पर्दाफाश करीन आणि मला पंडितांना कानाखाली मारायला फक्त एक मिनीट लागेल, असे म्हटले. त्याशिवाय ही शिक्षिका भरशाळेत थुंकताना दिसत आहे. (Teacher Drunk In School)
“सरकार माझ्या खिशात”, सरपंचालाही सुनावले खडेबोल
शाळेत सुरू असलेल्या शिक्षिकेच्या या गोंधळाची माहिती सरपंच इम्रान खान यांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शिक्षिकेला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र शिक्षिकेने सरपंचालाही सोडले नाही. तिने सरपंचाला म्हटले, “मला आदेश देणारा सरपंच कोण? सरकार माझ्या खिशात आहे. मी सीएम भजनलाल आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना चांगले ओळखते. काँग्रेसचे लोकही माझ्या खिशात आहेत आणि माझे कोणी काही नुकसान करू शकत नाही”.
गैरवर्तनामुळे शिक्षिकेच निलंबन
शाळेतील कर्मचारीही या महिला शिक्षिकेच्या गैरवर्तनामुळे वैतागले होते. ती महिला वारंवार थुंकते आणि शाळेतील सर्वांना धमकावते, असे येथील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. या महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधीचा आदेश जारी करताना अलवरच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की, ममता मीना यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांना कार्यालयात रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.