सुषमा स्वराज या ट्विटरवर किती सक्रिय असतात हे वेगळे सांगायला नको. ट्विट करत एखाद्याने मदत मागितली की स्वराज त्या याचकाला कधीच नाराज करत नाहीत. त्यामुळे नेटीझन्समध्ये मोदी सरकारच्या या मंत्री खूपच प्रसिद्ध आहे. आतापर्यंत ट्विटरवर प्रतिसाद देत त्यांनी अनेकांना मदत केली आहे. पण आता वेगळ्याच कारणांनी त्या आणि त्यांचे पती कौशल स्वराज चर्चेत आले आहे. एका तरुणीने स्वराज यांनी आपल्याला ट्विटवर ब्लॉक केल्याचा दावा केला आहे. अनब्लॉक करण्यासाठी या तरुणीने चक्क स्वराज यांचे पती कौशल यांच्याकडे मदत मागितली होती. यावर कौशल यांनी मिश्किलपणे या तरुणीला उत्तर दिले आहे.
VIRAL VIDEO : एक टी बॅग तुमचे तुटलेले नख पुन्हा जोडेल
ट्विटरवर असलेली रिक्षिता मिश्रा या तरुणीने स्वराज यांचे पती कौशल स्वराज यांच्याकडे ट्विट करत मदत मागितली होती. ‘सुषमा स्वराज यांनी मला ब्लॉक केले आहे. याचे कारण मला माहित नाही. मी त्यांची मोठी चाहती आहे. तेव्हा सुषमा स्वराज यांना मला अनब्लॉक करायला सांगा’ असे या तरुणीने कौशल यांना सांगितले. यावर कौशल यांनीही मिश्लिलपणे उत्तर दिले. ‘ मी यात तुमची काहीच मदत करू शकत नाही कारण त्या कदाचित मलासुद्धा ब्लॉक करतील’ असे उत्तर कौशल यांनी दिले. इतकेच नाही तर ‘तुम्ही स्वराज यांचे चाहते आहात हे ऐकून आनंद झाला. मी सुद्धा त्यांचा चाहता आहे म्हणूनच मी त्यांच्याशी लग्न केले’ अशीही मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. कौशल यांच्या या मिश्किल प्रतिक्रियामुळे सोशल मीडियावर त्यांची खूपच चर्चा होत आहे. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेकांनी कौशल यांच्याकडे अनब्लॉक करण्याची मागणी केली, कौशल यांनीही अनेकांना मजेशीर उत्तर दिली.