Old couple Viral video: ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये उतारवयात आजोबांचं प्रेम उफाळून आलं आहे. यावेळी एका व्हिडीओतून आजी – आजोबांचे खरं प्रेम हे जगासमोर आलं आहे.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात तर कधी कोणी डान्स करताना दिसतात. कोणी जुगाड सांगताना दिसतात तर कधी कोणी नवनवीन गोष्टी शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका आजोबांना आजीमध्ये वसंतसेना दिसली आणि त्यानंतर आजोबांनी असं काही गाणं गायलंय की तुम्हीही अवाक् व्हाल. आजोबांचा हा रोमँटिक अदांज पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, व्हिडिओत तुम्हाला एक आजी आणि आजोबा दिसत आहे.मुख्य म्हणजे दोघांचा पोशाख अस्सल पारंपरिक आहे,ज्यात आजोबांनी पांढऱ्या रंगाचा पायजमा-शर्ट आणि आजींनी मस्त साडी नेसलेली आहे.काही वेळात आजोबा आजींना विचारतात ‘गाणं म्हणू का मग? आजोबा म्हणतात मी तुझ्यावरचं गाणं म्हणतो’.मग आजोबा “डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली” हे गाणं गाण्यास सुरुवात करतात. आजोबा इतक्या मनापासून हे गाणं बोलत आहेत की पाहून प्रत्येक जण म्हणेल, प्रेम असावे तर असे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय की, “आजोबांनी आजींसाठी म्हटलं अतिशय सुंदर गीत, दोघांचा लाडिक रोमान्स, निःस्सीम प्रेमाला वय आजिबात आडवं येत नाही. फार छान आहेत हे आजी आजोबा!” आणखी एकानं म्हंटलंय की, “वा खूप भारी.. मराठी लोकसाहित्यातलं हे बाबांच जगणं प्रेम देऊन गेलं..”