Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांचे व्हिडीओ सर्वाधिक असतात. सगळं प्रेम एकीकडे आणि लोकांचं कुत्र्यावर असणारं प्रेम एकीकडे! होय. डॉग लव्हर्सला काय तोड नाही. त्यांच्या इतकं प्रेम तर एखादी व्यक्ती सुद्धा कोणत्या व्यक्तीवर करत नसेल. बरेचदा तर ही डॉग लव्हर्स असणारी कॅटेगिरी सोशल मीडियावरच एकमेकांना भिडते. कुत्र्यावर असणारं इतकं प्रेम त्यांना कधी कधी सगळ्या हद्दी पार करायला लावतं. आता तुम्ही म्हणाल छे छे! असं कसं? कुत्र्यांसाठी कोण का भांडेल? पण हे होतंय. माझ्या कुत्र्यालाही कुत्रा म्हणू नका त्याच्या नावाने हाक मारा असं म्हणणारी देखील लोकं आता अस्तित्वात आहेत. मागे एक व्हिडीओ वायरल झाला होता ज्यात एक कुत्रा एका लहान मुलाला लिफ्ट मध्ये चावतो. आठवतोय? असाच एक लिफ्टमधला व्हिडीओ पुन्हा समोर आलाय. ज्यात लहान मुलानं प्लिज कुत्रा लिफ्टमध्ये आणू नका मला भीती वाटते असं सांगितल्यावर या महिलेनं ८ वर्षाच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एका महिलेने ८ वर्षांच्या मुलाला लिफ्टमधून ओढत नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना गौर सिटी 2 च्या 12 व्या अव्हेन्यूमध्ये घडली.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा लिफ्टमध्ये उभा होता तेव्हा अचानक ती महिला तिच्या पाळीव कुत्र्यासह आत आली. यावेळी हा मुलगा कुत्र्याला घाबरला. मुलाने महिलेला हात जोडून कुत्र्याला आत घेऊन येऊ नये अशी विनंती केली. मात्र, महिलेने मुलाची स्थिती समजून घेण्याऐवजी रागाच्या भरात त्या मुलाला लिफ्टमधून बाहेर काढले आणि चापट मारण्यास सुरुवात केली. लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, मुलगा अक्षरश: हात जोडून रडत रडत महिलेला विनवणी करत आहे मात्र महिलेने मुलाला बेदम मारहाण केली. पुढे तो पुन्हा लिफ्टमध्ये शिरला आणि रडताना दिसत आहे. या घटनेने सोसायटीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी सोसायटीच्या गेटवर घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतली आहे आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ adityakripa नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया दिलीय की, “जीव घ्यायचा होता का या बाईला?” तर आणखी एकानं, “या महिलेवर कारवाई करत कुत्रे पाळायला परवानगीच नका देऊ” अशी प्रतिक्रिया दिली आहे.