लग्न म्हटलं की नवरेदव घोड्यावरु वरात घेऊन लग्नमंडपात पोहोचणार हे ठरलेलं असतं. अनेकजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशावेळी नवरामुलगा किंवा नवरीमुलगी बाईकवरुन मंडपात प्रवेश करताना दिसतात. यापेक्षा अजून काय वेगळं करु शकतो याचा विचार अनेकजण करत असतात. पण बंगालमधील एका तरुणाने फक्त विचार केला नाही तर थेट रोड रोलर घेऊन लग्नमंडपात पोहोचला. या नवरदेवाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरका पात्रा असं या तरुणाचं नाव आहे. ‘मला माझ्या लग्नात काहीतरी वेगळं करायचं होतं. कार किंवा घोड्यावर बसून येण्यात काही नवं राहिलेलं नाही. मला काहीतरी असामान्य करत प्रवेश करायचा होता’, असं त्याने सांगितलं आहे. पुढे तो बोलला की, ‘आपण नेहमी एखाद्या विंटेज कारमधून लग्नाला जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण मला एक जुना रोड रोलर दिसला आणि त्याच्यावरुन प्रवेश करण्याचं ठरवलं’.
या रोड रोलरसाठी जास्त भाडंही द्यावं लागलं नाही. त्यामुळे हे खिशा परवडणारंही होतं असं अरका पात्राने सांगितलं. विशेष म्हणजे त्याची होणारी पत्नी अरुंधती हिलादेखील ही कल्पना प्रचंड आवडली होती. त्यामुळे तिने कोणताही विरोध केला नाही.
अरका पात्रा रस्त्यावरुन जात असताना त्याला पाहण्यासाठी गर्दी जमा झाला होता. रोड रोलरमधून जाणारा नवरामुलगा पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटत होतं.