आपल्या उत्पादनाला खास बनवण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्या उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी लक्झरी फॅशन हाऊस काहीही करायला तयार असतात. नुकतीच एक जाहिरात समोर आली आहे ज्यात खऱ्याखुऱ्या वाघांचा वापर केल्याने एका ब्रँडला लोकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. इटालियन डिझाइनर ब्रँड गुचीने १ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या वाघांचे चिनी वर्ष साजरे करण्यासाठी गुची टायगर कलेक्शन लॉंच केले. गुचीने याचसंबंधीच्या काही फोटोंचा प्रचार आपल्या सोशल मीडियावर केला आहे. फोटोशूटसाठी खऱ्या वाघांचा वापर केल्याबद्दल ग्राहक आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. लोकांचा राग शांत करण्यासाठी गुच्चीने शूटिंगदरम्यान कोणत्याही प्राण्याला इजा झाली नसल्याचे सांगितले आहे.
स्वतःच्या सेल्फी विकून विद्यार्थ्याने कमावले ७ कोटी रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गुची जाहिरात महिमेच्या फोटोमधील वाघ जमिनीवर आणि पिआनोजवळ बसलेले आहेत. गुचीने आपल्या इंस्टाग्रामच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, अमेरिकन ह्युमन सोसायटीने हे प्राणी उपस्थित असलेल्या सेटचे परीक्षण केले. तसेच कोणत्याही प्राण्याला इजा झाली नसल्याचे त्यांनी सत्यापित केले.
तथापि, अनेक इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी खऱ्या वाघांचा जाहिरातीसाठी वापर केल्यामुळे गुचीची निंदा केली आहे. जाहिरातींमध्ये वन्य प्राण्यांचा समावेश असणे योग्य नाही. वाघ हा काही पाळीव प्राणी नाही. त्यामुळे ही जाहिरात काहीही कामाची नसल्याचे अनेक वापरकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी शेअर केलेल्या ट्विटमध्ये वर्ल्ड अॅनिमल प्रोटेक्शन यूएसने लिहिले की, ” वाघ हा वन्य प्राणी असून देखील गुची त्यांचा पाळीव प्राणी आणि लक्झरी वस्तू म्हणून प्रचार करून चुकीचा संदेश पाठवत आहे.”