Gudi padwa rangoli designs : गुढी पाडव्याच्या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. नववर्ष उत्तम, आरोग्यदायी आणि सुख-समृद्धीने जावे यासाठी आपण उंच गुढी उभारतो. त्या गुढीला फुलांनी, साखरेची माळ, कडुनिंबाच्या पानांनी सजवतो. आपल्या घराला फुलांच्या माळा लावून, अंगणात किंवा सुंदर रंगसंगतीचा वापर करून रांगोळी काढली जाते.
यंदाच्या गुढी पाडव्यानिमित्त तुम्ही जर ट्रेंडी आणि अतिशय सोप्या रांगोळी डिझाइन्सच्या शोधात असाल तर इन्स्टाग्रामवरील ही तीन डिझाइन्स पाहा. पेन्सिल, बांगडी, पट्टी, बाटलीचे झाकण अशा वस्तूंच्या साह्याने या रांगोळ्या कशा काढायच्या ते शिकूया.
गुढी पाडव्यासाठी तीन रांगोळी डिझाइन्स
पहिली रांगोळी
प्रथम, केशरी रंगाने कलशाची बॉर्डर काढून घ्या. त्यामध्ये केशरी आणि गडद पिवळ्या रांगोळीने रंग भरून घ्या.
आता कलशाच्या खालच्या भागाला लागून, गुलाबी रंगाने साडीचा आकार काढून घ्या. आता पट्टीच्या मदतीने काढलेल्या रांगोळीला साडीच्या कोपऱ्यांसारखा आकार द्यावा.
कलश आणि साडीच्या डाव्या बाजूने गुढीसाठी उभारणाऱ्या चॉकलेटी रंगाने काठीचा आकार काढून घ्या.
आता गुलाबी रंगाच्या साडीच्या खालच्या भागावर पिवळ्या रंगाने बॉर्डर काढून त्याच्यावर हिरव्या आणि पिवळ्या रंगाने साडीचा काठ तयार करा. तसेच पिवळ्या रंगाने साडीवर बुट्ट्याची नक्षी तयार करा. शेवटी गुढीला सजवण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या साखरेची माळ, हिरवी पानं, झेंडूच्या फुलांच्या माळेची सुंदर नक्षी काढून घ्यावी.
कलशावर स्वस्तिक काढून, बाजूला मराठीमध्ये गुढी पाडवा लिहावे.
व्हिडीओ :
दुसरी रांगोळी
प्रथम पट्टीच्या मदतीने जांभळ्या रंगाची एक आयताकृती बॅकग्राउंड तयार करून घ्या.
आता या आयातीच्या बरोबर मध्यभागी रांगोळीने मराठीत गुढी पाडवा लिहून घ्या.
गुढी या शब्दाला वेलांटी देण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करा आणि वेलांटीला फेट्याचा आकार द्यावा. तसेच फेट्याला लाल किंवा केशरी रंगाने बॉर्डर काढून घ्या.
तसेच पाडवा या शब्दावर केशरी, पिवळा, हिरवा आणि पांढरा रंग वापरून छोटी गुढी रेखाटून घ्यावी.
सर्वात शेवटी संपूर्ण आयताला केशरी आणि पिवळ्या रंगांच्या झेंडूच्या फुलांप्रमाणे आरास करणारी नक्षी काढून घ्या.
व्हिडीओ :
तिसरी रांगोळी
प्रथम एक बांगडी जमिनीवर ठेवा आणि बांगडीला चिकटवून एक पेन्सिल ठेवून घ्या.
आता बांगडीमध्ये पिवळा रंग भरून झाकणाच्या मदतीने तो रंग बांगडीमध्ये एकसमान पसरून घ्यावा.
तसेच, पेन्सिलच्या बाजूने रांगोळी काढून गुढी उभारणाऱ्या काठीची बॉर्डर काढून घ्यावी. आता काळजीपूर्वक पेन्सिल आणि बांगडी बाजूला करा.
आता पेन्सिलने तयार केलेल्या बॉर्डरमध्ये लाल रंग भरून घ्या आणि पिवळ्या रंगाच्या कलशावर लाल रंगाने स्वस्तिक काढून घ्या.
कलशाला लागून गुलाबी रंगाची साडी रेखाटून घ्या. त्यावर लाल, हिरव्या रंगाने नक्षी काढून घ्यावी.
गुढी सजवण्यासाठी साखरेची माळ, झेंडूच्या फुलांचा हार आणि कडुनिंबाच्या पानासारखी नक्षी काढून घ्यावे.
सर्वात शेवटी गुढीच्या भोवती निळ्या रंगाने जिलबीसारख्या आकाराची नक्षी काढा.
व्हिडीओ :
यावर्षी अशा पद्धतीने तुम्ही गुढी पाडव्यासाठी रांगोळी काढू शकता.