Lucky Car Burial Ceremony : सर्वांचं स्वप्न असतं की आपल्याकडे एक चारचाकी वाहन असावं. अनेक जण स्वत:च्या हिमतीवर किंवा कर्ज काढून का होईना हे स्वप्न पूर्ण करतात. त्या कारला फुलाप्रमाणे जपतात. अनेकांचे कुटुंब त्या कारवर अवलंबून असते, त्यामुळे तिला जराही ओरखडा आला तरी अनेकांना झोप लागत नाही. याच कारच्या जीवावर अनेक जण श्रीमंत होतात. गुजरातमधील अशाच एका व्यक्तीने कारवर आपल्या कुटुंबाची अनेक स्वप्न पूर्ण केली. पण, ती कार जुनी झाल्यानंतर भंगारात न विकता चक्क ती दफन केली. इतकेच नाही तर कारवर असलेले नितांत प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याने असे काही केलं आहे की ज्याची तुफान चर्चा रंगतेय. कारच्या अंत्ययात्रेचा आणि दफनविधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरदेखील तुफान व्हायरल होतोय.
अंत्ययात्रेसाठी कारला हार फुलांनी सजवले
तुम्ही आत्तापर्यंत एखाद्या मृत व्यक्तीची वाजत गाजत अंत्ययात्रा जात असताना पाहिली असेल, पण कधी कारची अत्यंयात्रा निघताना पाहिली आहे का? नक्कीच नसेल, पण गुजरातमधील एका व्यक्तीने आपल्या जुन्या कारची वाजत गाजत अंत्ययात्रा काढली. यावेळी कारला हार फुलांनी सजवले होते. कारला अखेरचा निरोप देण्यासाठी चक्क दोन हजार लोकांना कार्डद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी निमंत्रणाला मान देत अंत्ययात्रेसाठी चक्क दीड हजार लोक सहभागी झाले होते.
कारच्या अंत्ययात्रेवेळी संपूर्ण गावातील १५०० लोक होते उपस्थित
हे प्रकरण गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील आहे. लाठी तालुक्यातील पदरशिंगा गावात संजय पोलारा यांचे त्यांच्या १८ वर्ष जुन्या कारवर इतकं प्रेम जडलं होतं की, त्यांनी त्या कारला ‘लकी’ मानलं होतं. त्यामुळे ही कार भंगारात न देता त्यांनी कुटुंबीयांसह गुरुवारी त्यांची लकी कार GJ05 CD7924 ची अंत्ययात्रा काढत तिला अंतिम निरोप दिला. कारच्या अंतिम संस्कारासाठी संत आणि अध्यात्मिक नेत्यांसह गावातील सुमारे दीड हजार लोक उपस्थित होते. पोलारा कुटुंबीयांनी त्यांच्या शेतात प्रमुख देवतेसमोर पुजाऱ्यामार्फत संस्कृत श्लोकांचे पठण करून कारचा अंतिम विधी पूर्ण केला.
हेही वाचा – बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात
अंत्यसंस्कारासाठी कार फुलांनी आणि हारांनी सजवली होती. यानंतर पोलारा यांच्या घरापासून त्यांच्या शेतापर्यंत मोठ्या थाटामाटात कार चालवत तिची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी कार कापडाने झाकण्यात आली आणि त्यानंतर कुटुंबीयांनी पूजा केली, मंत्रोच्चारांसह गाडीवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर माती टाकून कार पुरण्यात आली. कारवर माती टाकण्यासाठीदेखील खास जेसीबी मशीनची मदत घेण्यात आली. कारच्या अंत्ययात्रेसाठी संपूर्ण गावातून जवळपास दीड हजार लोक उपस्थित होते. यासाठी त्यांनी तब्बल चार लाखांचा खर्च केला.
पाहा कारच्या दफनविधी सोहळ्याचा Video
कारचे मालक संजय पोलारा यांच्या माहितीनुसार, त्यांनी १२ वर्षांपूर्वी वॅगन आर ही कार खरेदी केली होती. ही कार त्यांच्या कुटुंबासाठी नशीब पालटणारी ठरली त्यामुळे त्यांनी तिला “लकी” नाव ठेवले. या कारनंतर त्यांच्या कुटुंबात सुख, समृद्धी आली. व्यवसायात यशाबरोबरच माझ्या कुटुंबालाही समाजात मानसन्मान मिळाला, त्यामुळे ती कार विकण्याऐवजी मी श्रद्धांजली म्हणून माझ्या शेतात पुरली. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना याची माहिती मिळावी, यासाठी कार पुरलेल्या ठिकाणी रोपाची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.