Gujarat Floods Fact Check Video : गुजरातमध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे, ज्यामुळे १८ जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यात कच्छ, द्वारका, जामनगर, राजकोट, वडोदरासारखी शहरं पाण्याखाली गेली आहेत. यात वडोदरामध्ये पुरामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वडोदरातील विश्ममित्र नदीला भीषण पूर आला आहे. या नदीतील पुराच्या पाण्याबरोबर अनेक महाकाय मगरींनी मानवी वस्तीत शिरकाव केला आहे. शहरातील अनेक भागांमधील रस्त्यांवर लोकांना मगरींचे दर्शन झाले, ज्यामुळे नागरिकांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच सोशल मीडियावर मगरींचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे; ज्यात हा व्हिडीओ वडोदरातील पुरामुळे जलमय झालेल्या भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यात तीन ते चार मगरींचा एक कळप प्राण्याची शिकार करत नेत असल्याचे दिसते आहे. मात्र, या व्हिडीओची जेव्हा आम्ही सत्यता तपासली, तेव्हा एक वेगळीच माहिती समोर आली. त्यामुळे हा व्हिडीओ खरंच गुजरातच्या वडोदरामधील आहे की नाही, हे आपण सविस्तररित्या जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

X युजर फेडरलने त्यांच्या X हँडलवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने दावा केला आहे की, हा व्हिडीओ गुजरातमधील वडोदरा येथील आहे.

इतर वापरकर्तेदेखील समान दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्हाला या व्हिडीओच्या पोस्टवर काही कमेंट्स आढळल्या, ज्यामध्ये वापरकर्त्यांनी हा व्हिडीओ पाहिला आणि तो वडोदरा येथील नाही असे नमूद केले आहे.

यामुळे आम्ही व्हिडीओमधील कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला.

यावेळी’donnydrysdale’ च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेला व्हिडीओ आम्हाला आढळला.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, (भाषांतर): मगरींचे हे अविश्वसनीय दृश्य किम्बर्लीमधील डॉनी इम्बरलाँग यांनी टिपले आहे.

डॉनी इम्बरलाँग यांनी टिपलेल्या या अविश्वसनीय दृश्यात खाऱ्या पाण्यात खाण्यासाठी मगरींनी वापरलेली शक्ती आणि प्रवृत्ती पाहायला मिळते. या फुटेजमधून अनोखी गोष्ट दर्शवली जात आहे, ती म्हणजे जेव्हा हे घातक, शक्तिशाली शिकारी एकत्र येत अतिशय सावधपणे शिकार केलेल्या प्राण्याची वाटणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

जरी मगरी स्वेच्छेने त्यांनी शिकार केलेला प्राणी सहकारी मगरींबरोबर शेअर करत नाहीत. पण, एकत्र केलेली शिकार खाताना त्या एकमेकांना सहन करतात. यात मोठ्या मगरी अनेकदा शिकार केलेला प्राणी आधी स्वत: खातात. काही प्रकरणांमध्ये मगर उरलेले प्राण्याचे मांस एका निर्जन ठिकाणी ओढून नेत ठेवते. यानंतर पुन्हा भूक लागेल तेव्हा जाऊन खाते. ही युक्ती त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धींपासून आणि अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या इतर प्राण्यांपासून स्वत:चे अन्नाचे संरक्षण करण्यास मदत करते. यातून जंगलात त्यांच्या उल्लेखनीय जगण्याची प्रवृत्ती समोर येते.

डॉनी इम्बरलाँग यांच्या फेसबुक प्रोफाईलवरही हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

आम्ही Donny Imberlong यांना मेसेज केला. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील ईस्ट किम्बर्ली येथे काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली असून हा व्हिडीओ त्यांनी काढला आहे असे देखील त्यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे हा व्हिडीओ गुजरातमधील वडोदरा येथील नाही.

निष्कर्ष : गुजरातमधील वडोदरा येथील पुराच्या पाण्यात मगरींचा मुक्त वावर दिसून येत असल्याचा दावा केलेला व्हिडीओ प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किम्बर्ली येथील आहे. हा व्हिडीओ डॉनी इम्बरलाँगने घेतला आहे, त्यामुळे व्हायरल होणारा दावा दिशाभूल करणारा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat floods fact check video crocodiles roaming in vadodara floodwaters is actually from australia sjr