Gujarat heavy rain viral video of Residents playing garba: गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून काही भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. परंतु, या अतिवृष्टीतदेखील गुजराती बांधवांचे गरब्यावरील प्रेम काही कमी झाले नाही. पाण्याने भरलेल्या रस्त्यात काही नागरिकांनी चक्क गरबा खेळायला सुरुवात केली. आता याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
व्हायरल व्हिडीओ
गुजराती बांधवांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ बहुधा जन्माष्टमीच्या दिवशी रेकॉर्ड केल्याचं म्हटलं जातंय. या व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर गुडघाभर पाण्यात पूर्ण उत्साहात गरबा खेळताना दिसत आहेत. गरब्यासाठी खास स्पीकरवर म्युझिकचे आयोजन करण्यात आल्याचं या व्हिडीओतून दिसून येतंय. तसेच गरब्याबरोबरच दुसऱ्या बाजूला काही लोक दहीहंडीची तयारी करतानादेखील दिसत आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ @narendrasinh_97 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “पाण्याखालील मगरींचा धोका असतानाही वडोदरा येथे गुजराती बांधव गरबा खेळताना दिसले, गुज्जू रॉक्स”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचे थैमान
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये १ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, राज्यातील १४० जलाशय पूर्ण भरली असून २४ नद्या ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे आसपासच्या परिसराला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा… उकळत्या तेलात हात घातला अन्…, VIDEOतील माणसांचं कृत्य पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे अनेकांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच पुरातून वाचण्यासाठी अनेकांनी घराच्या छतावर आसरा घेतला होता. या परिस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य परिस्थिती आणि मदत कार्याच्या स्थितीवर चर्चा केली. गुजरात सरकारच्या विनंतीनुसार, भारतीय लष्कराने बचाव कार्यात मदत करण्यासाठी सहा तुकड्या पाठवल्या. तसेच एनडीआरएफच्या पथकाकडून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
हेही वाचा… हद्दच झाली! कारवर चढली महिला अन् झालं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का
दरम्यान, राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी वडोदरा आणि आसपासच्या भागात नद्या ओसंडून वाहत असल्याने पूरसदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.