जेव्हा कधी कुणाचं हे जग सोडून जातं तेव्हा लोकांना वाटत असतं की, पुन्हा त्या व्यक्तीची निदान एका क्षणासाठी तरी भेट व्हावी. पण विचार करा की, जर एखाद्या व्यक्तीची शोकसभा सुरू आहे आणि ती मृत व्यक्ती अचानक समोर आली तर? एका कुटुंबाने बेवारस मृतदेहाला आपला मुलगा समजून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्यांनी मुलासाठी शोकसभाचं आयोजनही केलं, पण ज्याच्यासाठी शोकसभा ठेवण्यात आली, तो त्याच्याच सभेसाठी जीवंत पोहोचला. अर्थातच कुणालाही हे वाचून आश्चर्य वाटेल. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
नेमकं काय घडलं?
तर त्याचं झालं असं की, गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर येथील एक कुटुंब काही दिवसांपूर्वी नोकरीसाठी अहमदाबादमध्ये आलं. यावेळी २७ ऑक्टोबर रोजी या कुटुंबातील ४३ वर्षीय व्यक्ती बृजेश हे आपल्या राहत्या घरातून अचानक गायब झाले. कुटुंबियांनी आजूबाजूच्या परिसरात अनेक ठिकाणी बरीच शोधाशोध केली, पण बृजेशचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबाने शेवटी बृजेश बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. काही दिवसांनी पोलिसांना एका पुलाखाली एक बेवारस मृतदेह सापडला. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिलेल्या बृजेशच्या कुटुंबियांना बोलावून मृतदेहाची ओळख करण्याचं सांगितलं. मृतदेह ओळखता येत नव्हता मात्र तरीही तो मृतदेह पाहून कुटुंबाने हाच बृजेशचा मृतदेह असल्याचं ओळखलं. त्यानंतर तो मृतदेह घरी नेण्यात आला, त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि नंतर बृजेशच्या मरणार्थ एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. आणि याच दरम्यान बेपत्ता झालेला नंतर त्याचा मृत्यू झाला आहे असं समजून ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले तोच त्याच्याच सभेसाठी जीवंत पोहोचला.
याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली
नरोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जो मृतदेह ताब्यात देण्यात आला तो पोलिसांना पुलाखाली टाकून दिलेल्या अवस्थेत सापडला होता. ब्रिजेशच्या कुटुंबीयांना ओळखण्यासाठी बोलावण्यात आले. कुटुंबीयांनी तो मृतदेह ब्रिजेशचाच असल्याचे समजून घेऊन गेलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले. आता ब्रिजेशला ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.