आत्ता नोकरीवर असणाऱ्या पीढीपर्यंत शाळांमध्ये शिक्षक हजेरी घेताना मुलं ‘हजर’, ‘हजर मास्तर’, ‘हजर बाई’, ‘प्रेझेंट मिस’ अशा काही प्रकारे हजेरी देत असत. लहानपणी सगळ्यांनीच अशा प्रकारे हजेरी दिली असावी. पण गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळकरी मुलं हजेरी देताना ‘येस सर’ऐवजी ‘जय श्री राम’ म्हणत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओची सध्या चर्चा होत असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
एक्सवर (ट्विटर) हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये एका शाळेचा वर्ग दिसत असून २५ ते ३० विद्यार्थी वर्गात बसल्याचं दिसत आहे. मागून शिक्षकांचा आवाज येत असून वर्गात दररोजप्रमाणे विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात आहे. पण ही हजेरी घेताना विद्यार्थी येस सर किंवा हजर असं काही न म्हणता चक्क ‘जय श्री राम’ म्हणत असल्याचं दिसत आहे. नेटिझन्समध्ये काहींकडून या प्रकाराचं कौतुक केलं जात असून काहींकडून त्यावर आक्षेप घेतला जात आहे.
शालेय विद्यार्थ्यांना याच वयापासून आपली संस्कृती आणि इतर बाबींचं अशा गोष्टींमधून प्रशिक्षण दिलं जाणं चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया एकीकडे दिली जात आहे. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारे शिक्षादानाच्या ठिकाणी मुलांना धार्मिक गोष्टींमध्ये गुंतवण्यावर काहींनी आक्षेप घेतला आहे.
व्हिडीओ नेमका कुठला वा कधीचा?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नेमका कुठला वा कधीचा आहे, याविषयी अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, व्हायरल चर्चेनुसार, हा व्हिडीओ गुजरातच्या बानसकंठा जिल्ह्यातील उत्तरेकडच्या भागात असणाऱ्या एका शाळेतला असल्याचं सांगितलं जात आहे. या शाळेत शिक्षक हजेरी घेत असताना मुलं येस सर ऐवजी जय श्री राम म्हणतात, असा दावाही केला जात आहे.
वडिलांचा संघर्ष कुणाला दिसत नाही; मुंबई लोकलमध्ये खाली बसून डबा खाणाऱ्या वडिलांचा VIDEO व्हायरल
२०१९ची पुनरावृत्ती?
दरम्यान, २०१९ साली गुजरातमध्ये अशाच प्रकारे शाळांमध्ये हजेरी देताना वेगळ्या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १ जानेवारी २०२० पासून हजेरी देताना मुलांनी जय भारत किंवा जय हिंद म्हणण्याचा आदेशच गुजरात सरकारनं काढला होता. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त त्यावेळी दिलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांच्या हजेरीशी संबंधित मुद्दा व त्याअनुषंगाने हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.