Gujrat viral video: बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या तरुणांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्था म्हणाव्या तितक्या वेगाने आणि सर्वसमावेशक वाढली नाही, हे बेरोजगारीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे. कमी शिकलेले तरुण लहान मोठे काम करणे सुरू करतात. मात्र, पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र, नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्याने तरुण बेरोजगार होत आहेत. गुजरातच्या भरूच जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या अंकलेश्वर येथील एका हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीने नोकरीची मुलाखत आयोजित केली होती. ही वॉक-इन मुलाखत असल्याने, या ठिकाणी तरुणांची इतकी गर्दी झाली की अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरातमध्ये मुलाखतीसाठी प्रथम प्रवेश करण्याच्या प्रयत्नात तरुणांच्या जमावाने एकमेकांना धक्काबुक्की केली. यावेळी त्या ठिकाणी लावलेले रेलिंगही कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर येथील लॉर्ड्स प्लाझा हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. तेथे थरमॅक्स कंपनीतर्फे वॉक इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीने पाच पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या होत्या, परंतु हजारो तरुण मुलाखतीसाठी आले होते. पाच जागांसाठी हजारो तरुणांची गर्दी होईल याचा अंदाज कंपनीला आला नाही. गर्दी नियंत्रित करण्यासाठी तिथे कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती, त्यामुळे गर्दी अनियंत्रित झाली. यात पुढे जाण्याची चढाओढ सुरू झाली आणि यातून धक्काबुक्कीची घटना घडली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: पुण्यात जमिनीचा वाद टोकाला गेला; बांधावरच एकमेकींच्या जीवावर उठल्या बायका, अखेर असं संपलं भांडण
कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही
या व्हिडीओत मुलाखतीसाठी आलेले तरुण कंपनीच्या गेटवर धक्काबुक्की आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांबरोबर वाद घालताना दिसत आहेत. आपल्याला कंपनीनेच फोन करून मुलाखतीला बोलावलं, पण आता आत जाण्यास मनाई केली जात असल्याचं काही तरुणांनी सांगितलं. मात्र, अद्याप या कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पूर्वीच्या तुलनेत आज नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. कमी नोकऱ्या निर्माण होत आहेत. बेरोजगारी ही देशापुढील सर्वात मोठी समस्या आहे. याच बेरोजगारीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.