भारतीय क्रिकेट संघाचा २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. या पराभवाने कोट्यवधी भारतीय निराश झाले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराजसह अनेक क्रिकेटपटूंना मैदानातच अश्रू अनावर झाले. अनेक जण कॅमेऱ्यासमोर आपल्या भावना लपवताना दिसले. आता खेळाडूंबरोबर चाहतेही या अनपेक्षित पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीत गुरुग्राममधील एका कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली आहे. या सुटीमुळे टीम इंडियाच्या पराभवाचा धक्का विसरण्यास मदत होईल, तसेच दुसऱ्या दिवशी ताकदीने कामावर परतता येईल, असे कंपनीचे मत आहे. या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करीत ही माहिती दिली आहे; जी आता चांगलीच व्हायरल होत आहे. त्यावर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.
गुरुग्राममधील मार्केटिंग मूव्हज एजन्सीमधील कर्मचारी दीक्षा गुप्ता हिने विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. वर्ल्ड कपमधील भारताच्या १० सामन्यांतील विजय सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर टीमचा अंतिम सामन्यातील पराभवही पोस्ट केला आहे.
या धक्क्यातून सावरण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिल्याची माहितीही तिने एका पोस्टमधून शेअर केली आहे.
तिने पोस्टमध्ये लिहिले की, आज सकाळी मला माझ्या बॉसच्या मेसेजने जाग आली; ज्यामध्ये भारताच्या हृदयद्रावक पराभवामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी सर्वांना एक दिवस सुट्टी घेण्यास सांगितले, हे आश्चर्यकारक होते. अधिकृत ईमेल येईपर्यंत आमच्यापैकी कोणीही यावर विश्वास ठेवला नाही.
तिने तिचा बॉस चिराग अलावधीने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिले की, नमस्कार टीम! विश्वचषकातील भारताचा पराभव पाहता, त्याचा टीममधील कर्मचाऱ्यांवर झालेला मानसिक परिणाम आम्हाला समजतो. या काळात कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी कंपनीने एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की, यामुळे प्रत्येकाला पराभवाचा धक्का बसण्यास मदत होईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकत्रितपणे कामावर परत यावे.