Fan Molest Women Anchor At Dhanush Movie Captain Miller: १२ जानेवारीला कॅप्टन मिलर या चित्रपटासह कोलावेरी बॉय ‘धनुष’ रुपेरी पडद्यावर परतण्यासाठी सज्ज आहे. अलीकडे कोणताही चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत येतो हे काही नवीन नाही. असाच काहीसा प्रकार धनुषच्या आगामी चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा घडला आहे. मात्र यावेळी चित्रपटातील कथानक किंवा सीन्समुळे नव्हे तर रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात झालेल्या भांडणावरून आता चर्चा सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, ३ जानेवारीला कॅप्टन मिलर चित्रपटासाठी चेन्नईमध्ये प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी एका हुल्लडबाज फॅनने अँकरचा विनयभंग केला असून त्यावरून अँकरने कार्यक्रमात त्याला चांगला धडा शिकवल्याचे समजतेय. कार्य्रक्रमाच्या वेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता अँकरने स्वतःच्या इन्स्टाग्राम आयडीवरून स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे.
ऐश्वर्या नावाच्या अँकरने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गर्दीतील एका व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अनेकांनी तिला समर्थन देत अशा प्रकारे, विनयभंग करणाऱ्याला धडा शिकवण्याची तिचे कौतुक केले. सोशल मीडियावरील प्रचंड प्रतिसादानंतर ऐश्वर्याने या घटनेवर मौन सोडत सांगितले की, “चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून किंवा छेड काढून जर कोणी पळून जाऊ शकत असेल तर मी हे स्वीकारूच शकत नाही.”
ऐश्वर्याने यासंबंधित एक इंस्टाग्राम स्टोरी सुद्धा टाकली होती, ज्यात तिने लिहिले की, “त्या गर्दीत, एका माणसाने मला नको तसा स्पर्श केला. मी लगेचच त्याचा प्रत्युत्तर दिले त्याला चांगला चोप देत धडा मिळेपर्यंत मी त्याला सोडणारच नव्हते. मी मारू लागल्यावर तो धावत गेला, पण मी त्याला सोडलंच नाही मी त्याचा पाठलाग केला. कोणालाही कुठल्याही महिलेच्या शरीराला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करता येईल हे मी कधीच मान्य करणार नाही. मी आरडाओरडा केला तेव्हा मला अनेकांनी साथ दिली. माझ्या आजूबाजूला चांगले लोकही आहेत, मी जगात अनेक दयाळू आणि चांगली माणसे पाहिली आहेत. पण मला या काही टक्के राक्षसांच्या आसपास राहण्याची भीती वाटते!!!
हे ही वाचा<< आमिर खानचा जावई नूपुर शिखरेने बनियान व शॉट्स घालून लग्न का केलं? हटके वरात लूकचं खरं कारण ऐकून कराल कौतुक
कॅप्टन मिलरचे निर्माते आणि स्थानिक पोलिसांनी अद्याप या घटनेबद्दल अधिकृत विधान जारी केलेले नाही.
दरम्यान, 12 जानेवारीला रिलीज होणारा कॅप्टन मिलरमध्ये धनुष याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. लांबलचक केस आणि चेहरा दाढीने भरलेला, अभिनेता पोस्टर आणि ट्रेलरमध्ये पूर्णपणे वेगळा आणि भयानक दिसत आहे. धनुष व्यतिरिक्त, कॅप्टन मिलरमध्ये प्रियंका अरुल मोहन, शिवा राजकुमार आणि संदीप किशन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.