कोलकातमधील मोहम्मद अजाजुद्दीन (११ वर्ष ) आणि जशिका खान (१२ वर्ष) यांचा कार्टव्हील्सचा एक TikTok वरील व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे. दिग्गज जिम्नॅस्टपटू नादिया कॉमिन्सीने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओची केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दखल घेत भेट घेण्याची इच्छा दर्शविली आहे.

मोहम्मद अजाजुद्दीन आणि जशिका यांचा जिम्नॅस्टीकचा व्हिडीओ पाहून क्रीडा मंत्री किरेन रिजिजू प्रभावित झाले आहेत. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनी ट्विट करत या जिम्नॅस्टीकपटूंची दखल घेतल्यामुळे मला आनंद झाला असल्याचे किरेन रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. जिम्नॅस्टिकमध्ये या मुलांना करियर घडवायचे असेल तर त्यांना योग्य संधी दिली जाईल, असेही त्यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले.

मोहम्मद अजाजुद्दीन आणि जशिका यांना जिम्नॅस्टिकमध्ये आवड आहे. आपली आवड जपण्यासाठी मागील तीन वर्षांपासून ते प्रशिक्षण घेत आहेत. या दोघांचेही जिम्नॅस्टीक खेळण्याचे प्रकार जागतिक दर्जाचे असल्याची प्रतिक्रिया त्यांचे नृत्य प्रशिक्षक शेखर राव यांनी दिली आहे.

“नादिया कोमॅन्सी यांनी आमची दखल घेतल्याचे समजल्यानंतर मला खूप आनंद झाला, मी माझ्या पालकांनाही याबाबत सांगितले. त्यांनाही याचा आनंद झाला. भविष्यात मला नादिया कोमॅन्सीसारखे बनण्याची इच्छा आहे”, अशा भावना जशिकाने व्यक्त केल्या.

दरम्यान, टिकटॉक व्हिडीओ प्रसिद्धी झोतात आलेले हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत. जशिकाचे वडील ड्रायव्हर असून तिची आई टेलरिंगच्या दुकानात काम करते, तर अजाजुद्दीनचे पालक मजूर आहेत.

Story img Loader