US Based Terrorist Warns India Hamas Like Attack: इस्त्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन वादात हमासच्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनचा एक नवीन व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धापासून धडा घेण्याची धमकी दिली आहे, अन्यथा भारतावर सुद्धा इस्त्रायलसारखी वेळ येऊ शकते असा इशाराही त्याने दिला आहे.
यूएस स्थित शिख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेचा प्रमुख, पन्नून म्हणाला की, “पंजाब ते पॅलेस्टाईनपर्यंत अनेक ठिकाणी ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने जागा बळकावली आहे त्यासगळ्यांना हेच सांगू की हिंसाचार हिंसाचाराला जन्म देतो. जर भारताने पंजाबची जागा बळकावणे सुरू ठेवले तर त्यावर नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल आणि त्याला भारत आणि पंतप्रधान मोदी जबाबदार असती.
तो पुढे म्हणाला की, “एसएफजेचा बॅलेट व मतांवर विश्वास आहे, पंजाबला मुक्त करणं हे आमचं ध्येय आहे. आता निवड भारताला करायची आहे बॅलेट की बुलेट”. कॅनडात दहशतवादी हरदीपसिंग निजारच्या हत्येचा SFJ बदला घेईल असेही संदेशात म्हटले आहे.
पन्नून आहे तरी कोण?
दरम्यान, अहमदाबाद येथे नियोजित भारत-पाकिस्तान ICC विश्वचषक २०२३ सामन्यापूर्वी धमक्या देण्याच्या आरोपाखाली पन्नूनवर एफआयआर दाखल झाल्यानंतर काही दिवसांनीच पन्नूनचा हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अहमदाबादचे सायबर क्राईम डीसीपी अजित राजियन यांच्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने सांगितल्याप्रमाणे, पन्नूनचे हे आधीच रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यांनंतर ही कारवाई करण्यात आली होती.
अमृतसरमध्ये जन्मलेला पन्नून २०१९ पासून राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) स्कॅनरवर आहे. चार वर्षांपूर्वी तपास संस्थेने खलिस्तानी दहशतवाद्याविरुद्ध पहिला खटला दाखल केला होता. पन्नूनवर दहशतवादी कृत्यांचे समर्थन करण्यापासून ते धमक्यांचे संदेश प्रसारित करण्यापर्यंत तसेच पंजाब आणि भारताच्या इतर भागांमध्ये भीती आणि दहशत पसरवल्याचे आरोप आहेत.
हे ही वाचा<< हमासच्या दहशतवाद्याचा चिमुकलीसह Video व्हायरल? नेटकरी हळहळले, ‘ही’ बाजू माहित असणं महत्त्वाचं, पाहा
NIA न्यायालयाने ३ फेब्रुवारी २०२१ रोजी पन्नूनच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते आणि गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी त्याला “घोषित अपराधी” (PO) म्हणून घोषित करण्यात आले होते.