लहानपणी शाळेमध्ये आपल्याला पत्र कसे लिहावे ते शिकवले जायचे. एवढेच नव्हे, तर परीक्षेमध्ये ‘नोकरी सोडताना राजीनाम्यासाठी पत्र लिहा’ असा प्रश्न तर अगदी हमखास विचारला जायचा; मात्र त्याचा उपयोग आपण प्रत्यक्ष आयुष्यात कधीच केला नाही. तंत्रज्ञान, इंटरनेट, कॉम्प्युटर व लॅपटॉप यांच्यामुळे आपण केवळ एक ई-मेल पाठवून विषय संपवतो. अर्थात, त्यामध्येही मजकूर लिहायचा असतो; मात्र इंटरनेटवर अनेकदा तोसुद्धा तयार मिळतो.
अशात सोशल मीडियावर सध्या हाताने पेपरवर लिहिलेल्या राजीनाम्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हे पत्र थेट मुंबईतील मित्शी इंडिया लिमिटेड [Mitshi India Ltd.] या कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी म्हणजेच कंपनीच्या सीएफओने लिहिले असल्याचे पत्रावरून समजते. रिंकू पटेल, असे या सीएफओचे नाव असून, हा लेखी राजीनामा त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाला [मॅनेजिंग डायरेक्टर] सादर करण्यासाठी १५ डिसेंबर रोजी लिहिलेला आहे.
हेही वाचा : “जमत नाही, तर ऑर्डर कशाला करता?” फ्लिपकार्ट कर्मचाऱ्याच्या या वाक्यावर नेटकरी नाराज; पाहा काय आहे नेमके प्रकरण….
या पत्राच्या उजव्या कोपऱ्यात तारीख घातलेली दिसते आणि डाव्या बाजूला पत्र कुणासाठी आहे ते आणि कंपनीचे नाव लिहिलेले आहे. एक ओळ सोडून, विषय- असे लिहून, ‘CFO पदाच्या राजीनाम्याबद्दल पत्र’ असे लिहिलेले आहे. नंतर पुन्हा एक ओळ सोडून, रीतसर पत्राची सुरुवात केलेली आहे. माननीय सर [dear sir] माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी माझ्या CFO या पदाचा तातडीने राजीनामा देत आहे.
या कंपनीसोबत काम करून मला बरेच काही शिकायला मिळाले आणि इथे काम करणे मी माझे भाग्य समजतो.
पत्र संपवताना शेवटी डाव्या कोपऱ्यात धन्यवाद, तुमचा विश्वासू, असे लिहून खाली सही केल्याचे आपण बघू शकतो.
मित्शी इंडिया लिमिटेड [Mitshi India Ltd.] ही कंपनी आधी, डेरा पेंट्स अॅण्ड केमिकल्स लिमिटेड [Dera Paints and Chemicals Ltd.] म्हणून ओळखली जात असे. ही कंपनी कागद, रंग, प्लास्टिक इत्यादीसारख्या वस्तूंचे उत्पादन करते, अशी माहिती ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या एका लेखातून समजली .
हा फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर इंडिया टुडेच्या अधिकृत पेजद्वारे शेअर केला गेला आहे. पोस्ट शेअर होताच आतापर्यंत त्याला आठ हजार लाइक्स मिळाले आहेत. सोबतच नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. त्यापैकी काही मोजक्या प्रतिक्रिया पाहू.
एकाने, “पत्रलेखनामध्ये दहापैकी दहा मार्क मिळाले”, असे लिहिले आहे. “अरे… अक्षर… !! तुम्हीही कितीही मोठे झालात तरी काही फरक पडत नाही,” असे दुसऱ्याने लिहिले आहे. “कर्सिव्हमध्ये नाही लिहिलं?” अशी प्रतिक्रिया तिसऱ्याने दिली. चौथ्याने, “माझ्यापेक्षा तर खूपच चांगलं लिहिलंय,” असे सांगितले. शेवटी पाचव्याने, “शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या,” असे म्हटले आहे.
त्यासोबतच अनेकांनी, “कोणत्या लहान मुलाकडून हे पत्र लिहून घेतलंय?”, “असं वाटतंय की एखाद्या लहान शाळेत जाणाऱ्या मुलानं हे पत्र लिहिलं आहे.” यांसारख्या प्रतिक्रिया लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील.