अमेरिकेने रविवारी आपला २४५ वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. ४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असून या दिनानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. केवळ अमेरिकन नाही तर तेथे स्थायिक झालेल्या इतर देशांतील प्रतिभवान व्यक्तींनीही अमेरिकेतील जनतेला सोशल नेटवर्किंगवरुन शुभेच्छा दिल्या. यामध्ये भारतीय वंशाचा शेफ विकास खन्नाचाही समावेश आहे. विकासने आपली कर्मभूमी असणाऱ्या अमेरिकेचे एक भावनिक संदेश पोस्ट करत आभार मानलेत.

नक्की पाहा >> पाच हजारांची गुंतवणूक ते ३४,३८७ कोटींचा मालक; जाणून घ्या ‘या’ भारतीयाचा थक्क करणारा प्रवास

विकास खन्ना हे नाव भारतामध्ये घराघरात ओळखीचं होण्यामागील मुख्य कारण म्हणजे मास्टर शेफ हा रिअॅलिटी शो. जगातील नामांकित शेफपैकी एक असणारा विकास खन्नाला फूड इंडस्ट्रीमधील नामांकित ‘मिशेलिन स्टार’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेलं आहे. मात्र आज विकास यशाच्या शिखरावर असला तरी त्याला हे यश फार मेहनतीने मिळालेलं आहे. त्याने अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी पोस्ट केलेल्या संदेशामधूनच हे दिसून येत आहे.

विकासने चार जुलैनिमित्त एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये त्याने एका छोट्या कुत्र्याला हातात पकडलं आहे. या एडीटेड व्हिडीओमध्ये मागे छान म्युझिक वाजत असून फाटके फोडून आनंद साजरा केला जात असल्याचं दिसत आहे. “माझ्याकडे नोकरी किंवा इतर काही साधनं नसतानाही मी अमेरिकेमध्ये आलो. रस्त्यांवर राहून मी दिवस काढण्यापासून ते अमेरिकेच्या चार राष्ट्राध्यक्षांसाठी जेवण बनवण्यापर्यंतचा (होस्ट करण्याचा) प्रवास मी केलाय. अनेक उद्योगांमध्ये विचार स्वातंत्र्य आणि विविधता देणार हा देश आहे. अमेरिका ही अनेक अद्भूत संधी देणारी भूमी आहे, तुम्ही फक्त इथे प्रयत्न करत राहिलं पाहिजे. सर्वांना ४ जुलैच्या शुभेच्छा,” असं विकासने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुलाखतीत सांगितला होता न्यू यॉर्कमधील संघर्ष….

विकास खन्ना समाजकार्यात प्रचंड सक्रिय आहे. करोना साथीच्या कालावधीमध्ये अमेरिकेत असतानाही त्याने लॉकडाउनच्या काळात भारतातील गरीबांना मदत केली. ‘फीड इंडिया’ अंतर्गत त्याने आजवर हजारो गरीबांना अन्नदान केलं आहे. ही भूकेबद्दलची जाणीव भारतातील भूक पाहून त्यांच्यात निर्माण झाली का? असा प्रश्न बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्याला विचारला गेला. या प्रश्नावर विकास खन्नाने दिलेलं उत्तर ऐकून अँकरची बोलतीच बंद झाल्याचं पहायला मिळालं होतं. “आता तू प्रसिद्ध शेफ म्हणून ओळखला जातोस. तू बराक ओबामांसाठी जेवण केलं आहेस. जगप्रसिद्ध शेफ गॉर्डन रामसे यांच्या शोमध्ये झळकला आहेस. तुझा प्रवास एका गरीब कुटुंबातून सुरु झाला तरीही तू इतकं यश मिळवलंस. तुझ्यातील ही भूकेबद्दलची जाणीव भारतातील भूक पाहून निर्माण झाली का?” अशा आशयाचा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या अँकरने विकास खन्नाला विचारला होता. या प्रश्नावर “भूकेबद्दलची ही जाणीव भारतातून आलेली नाही. कारण माझं बालपण अमृतसरमध्ये गेलं आहे. तिथे एकत्र जेवणाची पद्धत आहे. त्याला आम्ही लंगर म्हणतो. या लंगरमध्ये एका वेळेस संपूर्ण शहर जेऊ शकतं. भूकेबद्दलची ही जाणीव माझ्यात न्यू यॉर्कमुळे आली. एका ब्राऊन रंगाच्या मुलाला अमेरिकेत नोकरी मिळवणं सोपं नव्हतं. न्यूयॉर्कमध्ये आल्यावर सुरुवातीच्या काळात जो संघर्ष मी केला त्याने मला भूकेचा खरा अर्थ शिकवला.” अशा आशयाचं उत्तर विकास खन्ना दिलं होतं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

Story img Loader