गुगलनं ‘डुडल’च्या माध्यमातून भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वैविध्यतेनं नटलेला भारत गुगलनं आपल्या डुडलच्या माध्यामातून साकारला आहे. विविध भाषा, परंपरा, कला, जैवविविधतेनं नटलेला भारत डुडलनं साकारत भारताची विविधतेनं परिपूर्ण असलेली समृद्ध संस्कृती दर्शवली आहे. गुगलच्या डुडलमध्ये भारताच्या विविध राज्यातील कलाविष्कार प्रामुख्यानं उठून दिसत आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला गुगल डुडलमार्फत देशवासीयांना शुभेच्छा देते.
ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता.
भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होती. १९५० रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो भारताचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावर्षीही इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आग्नेय आशियातील १० देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.