मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पावसादरम्यान मैदानाची देखभाल करणाऱ्या ग्राउंड स्टाफची मदत करण्यासाठी धावून गेलेला अर्जुन आता त्याच्या सेल्समनच्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हरभजन सिंगनं अर्जुनचा लॉर्ड्स बाहेर रेडिओ विकतानाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ‘ज्युनिअर सचिन तेंडुलकरनं लॉर्ड्स बाहेर आतापर्यंत ५० रेडिओ विकले आहेत. अजून काहींचा खप व्हायचा बाकी आहे त्यामुळे त्वरा करा’ असं मजेशीर ट्विट हरभजननं केलं आहे.

गळ्यात डिजिटल रेडिओचा मोठा बॉक्स अडकवून लॉर्ड्स बाहेर सेल्समनच्या भूमिकेत शिरलेल्या अर्जुनचा हा अंदाज अनेकांना आवडला. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सध्या कसोटी मालिका सुरु आहे. यावेळी भारतीय संघाबरोबर अर्जुन सरावही करत आहे. दरम्यान दोनदिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मैदानाची काळजी घेण्यासाठी धडपडणाऱ्या ग्राऊंड स्टाफच्या मदतीलाही अर्जुन धावून गेला होता. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंटच्या अधिकृत अकाऊंटवरून मदतीसाठी धावून आलेल्या अर्जुनचा कौतुक करण्यात आलं होतं.