Harsh Goenka Slams L&T Chairman : कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती तास काम करायचे याबाबत सोशल मीडियासह विविध माध्यमांतून बरीच चर्चा होत असते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी यावर अनेकवेळा भाष्य केले होते. अशात आता लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी रविवारसह आठवड्यातून ९० तास काम करावे, असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणनंतर अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोयंका यांनी, आता रविवारचे नाव बदलून ‘सन-ड्युटी’ करा म्हणत लार्सन अँड टुब्रोच्या अध्यक्षांना टोला लगावला आहे.
रविवारचे नाव ‘सन-ड्युटी करा’
एसएन सुब्रह्मण्यम यांचा कामाच्या तासांबद्दलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. याबाबत उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, “आठवड्यातून ९० तास काम करायचे का? रविवारचे नाव बदलून ‘सन-ड्युटी’ का ठेऊ नये आणि ‘डे ऑफ’ ही एक काल्पनिक संकल्पना का बनवू नये! चांगले आणि स्मार्ट काम करण्यावर माझा विश्वास आहे, पण आयुष्याला कायमचे ऑफिस शिफ्टमध्ये बदलायचे का? हा बर्नआउटचा एक प्रकार आहे, यशाचा नाही. काम आणि जीवनाचा समतोल पर्यायी नाही, तो आवश्यक आहे. बरं, हे माझे वैय्यक्तिक मत आहे!” या पोस्टबरोबर गोयंका यांनी #WorkSmartNotSlave असा हॅश टॅगही वापरला आहे.
काय म्हणाले होते लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना विचारण्यात आले की, अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेली लार्सन अँड टुब्रो अजूनही कर्मचाऱ्यांना शनिवारी का काम करायला लावत आहे.
या प्रश्नाला उत्तर देताना लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम म्हणाले, “रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप आहे. जर मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले तर मला जास्त आनंद होईल, कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.”
ते पुढे म्हणाले होते की, “रविवारी घरी बसून तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार? पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा.”
हे ही वाचा : “मी देव नाही… माझ्याकडूनही चुका होतात”, पंतप्रधान मोदी पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच झळकणार
दीपिका पादुकोणने व्यक्त केला संताप
या मुद्द्यावर आता प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील प्रतिक्रिया दिली आहे. दीपिकाने सोशल मीडिावर पोस्ट करत, इतक्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधाने करतात हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच तिने यावेळी मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.