Harsh Goenka Questions ISRO S. Somnath Salary: RPG ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. कधी प्रेरणादायी तर कधी मजेशीर पोस्ट टाकून ते फॉलोवर्ससह जोडलेले असतात. यावेळेस मात्र गोएंका यांनी गंभीर पोस्ट केली आहे. चांद्रयान ३, आदित्य एल- १ सारख्या मोहिमांच्या पाठीचा कणा असणाऱ्या इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या पगारावरून गोएंका यांनी ‘X’ (पूर्व ट्विटर) वर पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोस्टमध्ये गोयंका यांनी खुलासा केला की एस सोमनाथ यांना महिन्याला २.५ लाख रुपये पगार मिळतो. एस सोमनाथ यांच्या विज्ञान आणि संशोधनाच्या आवडीबद्दलही लिहीत त्यांनी आपल्या फॉलोवर्सना त्यांना मिळणारा पगार योग्य आहे का? त्यांच्या कामाला न्याय देत आहे का? असा प्रश्न केला आहे.

हर्ष गोएंका यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “एस. सोमनाथ यांच्यासारखी मंडळी ही पैशाच्या पलीकडे अनेक गोष्टींनी प्रेरित असतात, त्यांची विज्ञान व संशोधनाची उत्कट आवड व त्याप्रती समर्पण हे थोर आहे. राष्ट्राला अभिमान वाटावा असे त्यांचे काम आहे. त्यांनी देशासाठी काम करत स्वतःचाही हेतू साध्य केला आहे. हे करताना त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले आहे. अशा समर्पित लोकांसमोर मी माझे मस्तक झुकवतो”

हर्ष गोएंका ट्वीट

दरम्यान, गोएंका यांच्या ट्वीटवर जनता पार्टी अशा अकाउंटवरून एक टीका करणारे उत्तर आले होते, यात लिहिलं होतं की, “इस्रोच्या अध्यक्षांना कित्येक हजार कोटींचे बजेट मिळते ज्यात कितीतरी झोल केला जातो. त्यांना अडीच लाख रुपये पगाराची गरजच नाही, मुळात या श्रेणीच्या अधिकाऱ्यांना इतका पगार देण्याची गरजच काय?”

या ट्वीटवर उत्तर देत गोएंका यांनीही खडेबोल सुनावले आहेत, देशाला इतकी प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या इस्रोच्या सक्षम आणि प्रामाणिक अध्यक्षावर विनाकारण हल्ला होतो, हे दुर्दैवी आहे. इस्रो हा आपला राष्ट्रीय अभिमान आहे आणि आपण सर्वांनी सोमनाथ आणि त्यांच्या टीमचे कौतुक करायला हवे”

दरम्यान, गोएंका यांच्या ट्वीटवर अनेकांनी अनुमोदन दर्शवले आहे. अडीच लाख काय त्यांना तर २५ लाख पगार द्यायला हवा असेही काहींनी म्हटले आहे. गोएंका यांच्या ट्वीटनंतर काहीच तासात यावर जवळपास आठ लाखाहून अधिक व्ह्यूज, हजारो कमेंट्स व लाखो लाईक्स आल्या आहेत.

गोएंका यांनी मांडलेल्या प्रश्नावर तुमचं मत काय हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harsh goenka questions isro s somnath salary asks monthly is it fair janata party negative comments slammed with reply svs
Show comments