भारतात असे अनेक पदार्थ आहेत की, जे परदेशांत खूप हटके नावांनी विकले जातात. अगदी आपल्या मुंबईचा वडापावदेखील परदेशांत वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध आहे. हे पदार्थ परदेशांतील लोकही आवडीने खातात. त्यात दक्षिण भारतातील पदार्थ सर्वाधिक फेमस आहेत. पण, दक्षिण भारतातील पदार्थ अमेरिकेत कोणत्या नावांनी ओळखले जातात, तुम्हाला माहीत आहेत का? नसेल तर, उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केलेली एक पोस्ट पाहाच. कारण- या पोस्टमध्ये दक्षिण भारतातील पदार्थांना अमेरिकेत काय म्हणतात याची लिस्ट आणि किंमत पोस्ट केली आहे. हर्ष गोयंका यांनी एका अमेरिकन रेस्टॉरंटचे मेन्यू कार्ड पोस्ट केले आहे. त्यात पदार्थांची विचित्र नावे आणि किंमत दिली आहे; जी पाहून उद्योपती हर्ष गोयंकादेखील आश्चर्यचकित झाले आहेत.

नेकेड क्रेप नावाचा पेपर डोसा

हर्ष गोयंका यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी अमेरिकेतील एका दक्षिण भारतीय रेस्टॉरंटच्या मेन्यूवर पेपर डोसाला नेकेड क्रेप या फॅन्सी नावाने ओळखले जात असल्याचे म्हटले आहे. मेन्यू कार्डचा स्क्रीनशॉट शेअर करीत हर्ष गोयंका यांनी लिहिले, “कोणाला माहीत होते की, वडा, इडली आणि डोसाची इतकी फॅन्सी नावं असू शकतात? या विचित्र नावांनी खाण्याची मजाच निघून गेली. तुम्ही सहमत आहात का?”

१३०० रुपयांना दोन इडल्या

फक्त डोसाच नाही, तर इतरही पदार्थ जसे की, इडलीला डंक्ड राइस केक आणि मेदू वड्याला डंक्ड डोनट डिलाईट, असे युनिक नाव देण्यात आले आहे. इतकेच नाही, तर या पदार्थांची किंमत पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरचा विश्वास उडेल. पेपर डोसाची किंमत $17.59 आहे; जी जवळपास १४०० रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. दोन इडल्यांची किंमत $15.39 (सुमारे १३०० रुपये) आणि दोन वड्यांची किंमत $16.49 (सुमारे १४०० रुपये) आहे. हे मेन्यू कार्ड भारतीय क्रेप कंपनी नावाच्या शाकाहारी रेस्टॉरंटचे आहे; जे अमेरिकेतील फ्रेमिंगहॅममध्ये आहे.

नावांसह किंमतही विचित्र

हर्ष गोयंका यांनी ही पोस्ट शेअर केल्यापासून, आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. कमेंट्समध्ये लोक या मेन्यूवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “किंमत खूप जास्त आहे. १३०० ते १५०० रुपये प्रति प्लेट.” आणखी एका युजरने लिहिले, “तिथे प्रत्येक एका डिशसाठी किमान तीन जण तरी काम करीत असतील.” तिसऱ्या युजरने लिहिले, “नावाबरोबर किंमतही विचित्र आहे. भारतात कुठेही इडली किंवा वडा इतका महाग आहे, असे मला वाटत नाही.”