Harsh Goenka: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी एंटरप्राईजेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका हे त्यांच्या एक्स पोस्टसाठी नेहमी चर्चेत असतात. सध्या त्यांनी एक्सवर चाललेल्या एका वादात उडी घेतली आहे. ‘ओला’चे संस्थापक भाविश अग्रवाल आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात एक्सवर शा‍ब्दिक युद्ध सुरू आहे. गोयंका यांनी या वादात उडी घेतली असून भाविश अग्रवाल यांना पाठिंबा दिला आहे. हर्ष गोयंका यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “जर मला कमी अंतरावर म्हणजे एक कमरा ते दुसरा ‘कमरा’ प्रवास करायचा असेल तर मी माझ्या ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करतो.”

कॉमेडियन कुणाल कामराने ओला स्कूटरच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून भारतात ओलाच्या सर्विस सेंटरच्या दुरावस्थेबाबत पोस्ट केली होती. या पोस्टनंतर भाविश अग्रवाल आणि कुणाल कामरामध्ये एक्सवर वाद सुरू झाले. ओला सर्विस सेंटरच्या बाहेर ओला स्कुटरची रांग आल्याचा फोटो कुणाल कामराने पोस्ट केला होता. कुणाल कामराने केलेल्या पोस्टमध्ये, नितीन गडकरी आणि जागो ग्राहक मंचालाही टॅग केले आहे.

कुणाल कामराने पोस्ट टाकल्यानंतर त्यावर भाविश अग्रवाल यांनी सुरुवातीला सयंत रिप्लाय दिला. मात्र भाविश अग्रवाल यांनी कुणाल कामराच्या कॉमेडिला फ्लॉप कॉमेडी म्हटल्यामुळे कुणाल कामराने आणखी पोस्ट टाकल्या, ज्याचे उत्तर भाविश अग्रवाल देत होते. ज्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला.

कुणाल कामराच्या पोस्टनंतर आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ओलाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.