नाव- मार्क झकरबर्ग
ग्रॅज्युएट (काँप्युटर सायन्स)
हार्वर्ड युनिव्हर्सिटी
‘फेसबुक’च्या मार्क झकरबर्गच्या घराबाहेर आता अशी पाटी लागू शकते. आता यात काय मोठं? पण जगातलं सगळ्यात मोठं सोशल नेटवर्क बनवणाऱ्या मार्क झकरबर्गने हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा आपला कोर्स पूर्ण न करताच काॅलेज सोडलं होतं. म्हणजे मार्क झकरबर्ग चक्क काॅलेज ड्राॅपआऊट आहे! पण आता त्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटी मानद पदवी देत त्याचा गौरव करणार आहे.
२००४ हार्वर्डमध्ये काँप्युटर सायन्सच्या कोर्सला असताना त्याच्या काॅलेजच्या हाॅस्टेलमधून मार्कने ‘फेसबुक’ची निर्मिती केली होती. सुरूवातीला फक्त हार्वर्डच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या नेटवर्कला हळूहळू बाकी विद्यापीठांमध्येही प्रसिध्दी मिळायला लागली. आपल्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’वर पूर्णवेळ काम करण्यासाठी मार्कने आपला कोर्स अर्धवट सोडला. आणि त्यानंतर गेल्या १३ वर्षात फेसबुक ने घडवलेला इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे.
वाचा- Women’s day 2017: या चित्रांमध्ये महिला आहेत का?
हार्वर्ड युनिव्हर्सिटी आता मार्क ने अर्धवट सोडलेल्या अभ्यासक्रमाची मानद पदवी देत त्याचा गौरव करणार आहे. यावर्षी हार्वर्डच्या दीक्षांत सोहळ्यात त्याला ही पदवी दिली जाणार आहे. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून तो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
मार्क झकरबर्ग आणि बिल गेट्स यांचा याचसंदर्भातला एक हलकाफुलका व्हिडिओ प्रसिध्द झालाय. ‘मायक्रोसाॅफ्ट’च्या बिल गेट्स यांनीही हार्वर्डमधला आपला कोर्स मायक्रोसाॅफ्टला संपूर्ण वेळ देता यावा म्हणून अर्धवट सोडला होता.
आता व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बिल गेट्स मार्क झकरबर्गला दीक्षांत सोहळ्यामध्ये करायचं भाषण तयार करायला मदत करत आहेत असा काहीसा विनोदी सीन आहे. फेसबुक आणि मायक्रोसाॅफ्ट या जगातल्या दोन महाबलाढ्य कंपन्यांचे मालक आणि टेक्नाॅलाॅजी गुरूंमधली ही चर्चा एेकणं खूपच मनोरंजक आहे. पाहा हा व्हिडिओ
सौजन्य- फेसबुक
हा व्हिडिओ शेअर करताना मार्कने त्याच्या स्टेटस् मध्ये ‘गोईंग बॅक टू स्कूल’ असं लिहिलंय.
मार्क झकरबर्ग आणि बिल गेट्सच्या काॅलेजशिक्षण अर्धवट सोडण्याने ‘प्रभावित’ झालेल्या बहाद्दरांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या दोघांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम अर्धवट सोडला होता. ही युनिव्हर्सिटी जगातली पहिल्या क्रमांकाची युनिव्हर्सिटी आहे. इथला कोर्स अर्धवट सोडण्याआधी या दोघांनी या युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवला होता! इथल्या काही शे जागांसाठी अर्ज करणाऱ्या अक्षरश: लाखो लोकांना मागे टाकत या दोघांनी इथे प्रवेश मिळवला होता.
त्यामुळे ‘आपणही कोर्स अर्धवट सोडू आणि मोठे तीर मारू, आपलं काम पाहून विद्यापीठ देईलच पदवी’ अशा स्वरूपाचा विचार करणाऱ्या ‘सुजाण’ विद्यार्थ्यांनो, पुस्तकं उघडा आणि येणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासाला लागा.