विविध परीक्षांमधील कॉपीची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी अनेक राज्यांत कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र, या कायद्याला बगल देत काही ठिकाणी कॉपी करण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशाच प्रकारे हरियाणातील दहावीच्या बोर्ड परीक्षेत सर्रासपणे कॉपीचा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही लोक दोरीच्या साह्याने परीक्षा केंद्राच्या भिंतीवर चढून, खिडकीमधून व टेरेसवरून चढून कॉपीच्या चिठ्ठ्या फेकत आहेत. हा व्हिडीओ हरियाणातील नूह जिल्ह्यातील तवाडूच्या चंद्रावती शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरियाणा बोर्डाच्या १० व्या वर्गाच्या परीक्षा २७ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत आणि त्या २६ मार्च २०२४ पर्यंत सुरू राहणार आहेत. पण, केंद्रावर परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच पेपर आऊट झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. या परीक्षेदरम्यान अनेकांनी जीवाची पर्वा न करता, दोरीच्या साह्याने परीक्षा केंद्राच्या इमारतीच्या भिंतीवर चढून कॉपीच्या चिठ्ठ्या देण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान चुकूनही कोणाचा पाय घसरला असता, तर जीव गमवावा लागला असता. पण, तरीही अनेक लोक बिनधास्तपणे कॉप्या पुरवत राहिले. यावेळी परीक्षा केंद्राबाहेरील लोक फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना कॉपी पुरवणारे शिवीगाळ करीत होते.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आलेले लोकच त्यांना कॉपीच्या चिठ्ठ्या पुरवीत होते. पण, या घटनेच्या वेळी परीक्षा केंद्रावर तैनात असलेले पोलीस अधिकारी नेमके काय करीत होते, असा संतप्त प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे.