जेव्हा आपल्याकडे इंधनावर चालणाऱ्या गाड्या नव्हत्या, तेव्हा प्रवासासाठी लोक घोडागाडी, बैलगाडी अशा साधनांचा वापर करीत होते. मात्र, आता आपल्याकडे इंधन आणि बॅटरीवर चालणारी वाहने आली आहेत. असे असले तरीही हरियाणामधील एक तरुण प्रवासासाठी चक्क रेड्याचा वापर करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर bull_rider_077 नावाच्या अकाउंटद्वारे त्याने स्वतःचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये व्हिडीओ शेअर करणारा तरुण एका रेड्याच्या समोर उभा असलेला पाहायला मिळतोय. तरुणाने अगदी साधा जीन्स, टी-शर्ट असा पेहेराव केला असून, पाठीवर एक काळ्या रंगाची बॅग / दप्तर लावलेले आहे.
हेही वाचा : सशाचे हेल्मेट आणि रेड्यावरून रपेट? सोशल मीडियावरील ‘हा’ व्हिडीओ पाहिला का?
तरुण आपल्या डोळ्यांवर गॉगल लावतो आणि सेकंदात त्या रेड्याच्या पाठीवर स्वार होतो. रेड्याच्या तोंडाभोवती गुंडाळलेली दोरी हातात धरून, भरधाव वेगाने रस्त्याच्या मधून रेडा धावू लागतो. रेड्यावर स्वार झालेल्या या तरुणाला पाहून, त्यांच्या आजूबाजूचे लोक चांगलेच चकित झाल्याचे दिसतेय. अनेक जण तरुण आणि रेड्याचा हा व्हिडीओ किंवा फोटो आपल्या फोनमध्ये काढून घेत असल्याचे आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो.
या तरुणाने आपल्या अकाउंटवरून असे अनेक व्हिडीओ शेअर केले असून, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहू.
“त्याने हेल्मेट घातलं नाही म्हणून शिक्षा द्यायची की सीटबेल्ट लावला नाही म्हणून… असा पोलिसांना प्रश्न पडला असेल,” असे एकाने लिहिले आहे.
“प्राण्यांशी क्रूरतेने वागण्याची नवीन पद्धत दिसते,” असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“कल्पना चांगली आहे; पण ती दोरी त्या रेड्याच्या नाकातून घालणं खरंच गरजेचं आहे का?” असा प्रश्न तिसऱ्याने केला आहे.
“जे कोणी याला क्रूरता म्हणत आहेत. त्यांनी एकदा नीट पाहा. रस्त्यावरील इतर प्राण्यांच्या तुलनेत त्या रेड्याची खूप चांगली काळजी घेतली जाते हे स्पष्ट दिसतंय,” असे चौथ्याने लिहिले आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bull_rider_077 नावाच्या अकाउंटद्वारे शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ४७.३ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत. तसेच यावर २.७ लाइक्स आणि १६.३K इतक्या कमेंट्सदेखील आलेल्या आहेत.