उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या बंडाला २१ दिवस झाले आहेत. अशात आज अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अशाही शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर लवकरच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील या आशयाचं ट्वीटही केलं आहे. या सगळ्यात रोहित पवार यांनी एका मुलाखतीत अजित पवार यांच्याबद्दल केलेलं एक विधान चर्चेत आहे. २ जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाचा What’s App ग्रुपही सोडला आहे का? या प्रश्नाचं उत्तर रोहित पवारांनी दिलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
अजित पवार कुटुंबाच्या What’s App ग्रुपमधून बाहेर पडले आहेत का? यावर रोहित पवार म्हणाले, “दादा What’s अपवर नाहीत. त्यामुळे दादा किंवा साहेब (शरद पवार) हे What’s अपवर नाहीत आम्ही सगळे जण आहोत. त्यामुळे त्यांनी लेफ्ट होण्याचा प्रश्न येत नाही. ” असं रोहित पवार यांनी ‘खास रे’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तसंच अजित पवारांच्या बंडामागे भाजपा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- दादा, २०२४ साठी अजूनही विचार करा…
विठ्ठलाकडे मागितलेलं मागणं पूर्ण झालं नाही तर आपण त्याच्यावर नाराज होत नाही
पंढरपूरला आपण गेलं आणि विठोबाच्या चरणी डोकं ठेवलं आणि एखादी इच्छा व्यक्त केली आणि समजा ती इच्छा पूर्ण झाली नाही तरीही आपण विठोबावर नाराज होत नाही. विठूरायावरची आपली श्रद्धा आणि आस्था ही कमी होत नाही. त्यामुळे ज्या माणसाला खूप काही दिलं आहे सगळंच दिसलं असं मी म्हणणार नाही पण खूप काही दिलं आहे अशा व्यक्तीने नाराज होता कामा नये असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. कधी कधी सत्तेच्या ओघात आपण काही गोष्ट बोलून जातो. तसंच ते भाषण (५ जुलैला अजित पवार यांनी केलेलं भाषण) होतं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असंच म्हणत आली आहे. २०१४ पासून दोन पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे असं भाजपाकडून सांगितलं जातं. ते समजा खरं आहे असं जरी धरलं तरीही मागची नऊ वर्षे साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित पक्ष भाजपा या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला खेळवतोय असं म्हणायचं का? असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.
हे पण वाचा- अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार? हसन मुश्रीफ म्हणाले, “फक्त…”
२ जुलै २०२३ ला काय झालं?
२ जुलै २०२३ ला महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप झाला. कारण अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ५ जुलै रोजी झालेल्या भाषणात त्यांनी पक्षावर आणि चिन्हावरही दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी काँँगेसमध्ये तेव्हापासून शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. शरद पवारांनी पुन्हा एकदा मैदानात उतरत पक्ष बांधणीची तयारी सुरु केली आहे. तर अजित पवार यांनी आता आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी अशी भूमिका घेतली आहे. अशात अजित पवार हे फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवरुन बाहेर पडलेले नाहीत हे रोहित पवार यांनी सांगितलं आहे कारण ते What’s App वर नाहीत.