सध्या सोशल मीडियावरुन अनेक थरारक गोष्टी शेअर केल्या जातात. यामध्ये काहीवेळा थरारक चित्रपटामध्ये दिसणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. तर कधी ज्या गोष्टी पुस्तकातून वाचायला मिळतात त्या गोष्टींचा सोशल मीडियाच्या माध्यमातून साक्षात्कार होतो. चित्रपटातून साकार झालेले भयचित्र आणि पुस्तकातून शब्द रुपातील भयानक कथा या जगातील काही घटनांशी मिळत्या जूळत्या असतात. जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक ठिकाणे लोकांमध्ये रंगणाऱ्या कल्पना आणि तर्कवितर्कामुळे एखाद्या स्थळ चर्चेच्या केंद्रस्थानी येत असते. आत्मा, भूत- पिशाच्च यासारख्या घटनेमुळे लोकांच्या मनात भय निर्माण करणाऱ्या अशाच काही स्थळांची माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-नरक द्वार – तुर्कमेनिस्तान
जगभरामध्ये तुर्कमेनिस्तानमधील गॅसचे जुने क्षेत्र नरकद्वार म्हणून ओळखले जाते. रशियातील वैज्ञानिकांनी या ठिकाणी आग लावल्यापासून तब्बल ४० वर्षांपासून सतत या गॅसनिर्मिती होणाऱ्या परिसरात ज्वाला भडकताना दिसतात. आगीच्या ज्वालांमुळे या ठिकाणी जाणे सर्वात धोकादायक आहे. बऱ्याचदा या ठिकाणी माकडे भटकताना दिसली आहेत.
-ऑकिगहरा जंगल – माउंट फूजी, जापान (आत्महत्या जंगल)
जपानमधील माऊंट फुजीच्या उत्तर पश्चिम परिसरात ३५ वर्ग कि.मी पसरलेल्या जंगल हे जगातील ‘गोल्डन गेट’ नंतरची दुसरी कुख्यात जागा आहे. या ठिकाणी लोक आत्महत्या करण्यासाठी येतात. प्रत्येकवर्षी जवळ जवळ १०० लोक याठिकाणी आपले आयुष्य संपवतात. अनेक वर्षापासुन सुरु असणाऱ्या आत्महत्येच्या घटनांमुळे या जंगलामध्ये प्राणी नाही तर मृतदेहांच्या कवट्या आणि हाडांच्या अवशेष मोठ्या प्रमाणात दिसून येते. जंगलात निर्माण होणारी भीतीदायक परिस्थिती कमी करण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वर्षी साफसफाईचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
– बाहुल्यांचे बेट- मॅक्सिको
मॅक्सिको शहरातील बाहुल्यांचे बेट म्हणून प्रसिद्ध ठिकाण पर्यटनासाठी मुकले आहे. या ठिकाणी पावला पावलावर विखुरलेल्या विकृत बाहुल्यामुळे ते शैतानाचे घर झाले आहे. बेटावर विकृत बाहुल्या झाडाला टांगल्याचे दिसून येते. कि डॉन ज्यूलियन हा आपल्या पत्नी सोबत या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. बेटावरील वास्तव्यादरम्यान ज्यूलियनला एक अज्ञात शव मिळाले. या शवाच्या आत्माचा प्रभाव होऊ नये, म्हणून ज्यूलियनने बेटावरील झाडावर बाहुल्या लावण्यास सुरुवात केली.
– युनियन सिमेट्री- कनेक्टीकट, अमेरिका
अमेरिकेच्या पुर्वेला असणारी एक सामुदायिक स्मशानभूमी जगातील सर्वात भयानक स्मशानभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. ‘व्हाइट लेडी’ नावाच्या भूताचा या स्मशानात वावर असतो अशी दंतकथा सांगितली जाते. काही लोकांनी या ‘व्हाइट लेडी’ची छायाचित्रे देखील घेतली असल्याचा दावा केला आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात अनेकांना या ‘व्हाइट लेडी’चा अनुभव घेतल्याचे बोलले जाते. या भयावह प्रसंगामुळे सध्या रात्रीच्यावेळी स्मशान बंद ठेवण्यात येते.
-द व्हेली हाऊस सँन डिअॅगो- अमेरिका
व्हेली कुटुंबियांच्या रहस्यमय मृत्यूच्या घटनेमुळे सँन डिअॅगो शहरातील ‘द व्हेली हाऊस’ या हवेलीबाबत तर्कवितर्क ऐकायला मिळतात. या हवेलीच्या परिसरात भूते दिसतात असा दावा करण्यात येतो. थॉमस व्हेली यांच्या पणतु संबोधलेल्या रेनॉल्ड या तरुणीने या हवेलीत विष प्राषण करुन आत्महत्या केली होती. ही तरुणी या ठिकाणी भेट देणाऱ्या लोकांना हवेली फिरवून दाखवते अशा अनेक अफवा या परिसराबद्दल ऐकण्यात येतात.