पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक्स करत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यात. त्यानंतर भ्रष्टाचारीच काय पण सामान्य माणसांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकतर अनेक ठिकाणी एटीएम बंद त्यातून ५००, १००० खिशात ठेवणा-या आपल्याला सुट्ट्यांचा तुटवडा.. करणार काय? जिकडे जिकडे अशांतता आणि टेन्शन. अशातच आज गुरूवारी बँक अखेर सुरु झाल्या आणि अपेक्षेप्रमाणे नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच बँकेच्या बाहेर तूफान गर्दी केली. तासन् तास रांगेत उभे राहूनही नव्या नोटेचे दर्शन काही मिळेना. लोक इतके हैराण की विचारायची सोय नाही. तासन् तास ताटकळत उभे राहिल्यानंतर अखेर २००० रुपयांची नोट मिळाली अन् रांगेत उभे राहिल्यांचा जीव भांड्यात पडला. आता इतकी मेहनत करून मिळवलेल्या या नोटेसोबत लोकांनी सेल्फी काढला नाही तर नवलच ! त्यामुळे आज दिवसभारापासून सोशल मीडियावर सेल्फी विथ २०००, ५०० असा हॅशटॅग टाकून सेल्फी काढण्याचा ट्रेंडच  सुरू झाला आहे. जो तो या नव्या को-या नोटेसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. आता इतके कष्ट घेतल्यावर सेल्फी तो बनता है बॉस! काय मग तुम्ही काढला की नाही सेल्फी ?