मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाने आपला पार चढवायला सुरुवात केली. ऊन आणि गरमीपासून वाचण्यासाठी लोकं बाहेर जाणे टाळून घरीच राहणे पसंत करत आहेत. परंतु महत्त्वाच्या कामासाठी घर सोडावेच लागते. लोकांना या कडक उन्हापासून थोडा दिलासा मिळावा यासाठी एक सुंदर उपक्रम राबवण्यात आला आहे. या उन्हाळ्यात स्थानिकांची तहान भागवण्यासाठी एका तरुणाने आपले वैयक्तिक रेफ्रिजरेटर रस्त्यावर बसवले आहे. कोलकाता शहर आणि त्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘ला कोलकाता’ नावाच्या एका फेसबुक पेजवर याबद्दलची एक पोस्ट करण्यात आली आहे.
या पोस्ट मध्ये म्हटलंय, “उष्णतेचा सामना करण्यासाठी कोलकात्यात रस्त्याच्या कडेला तात्पुरते रेफ्रिजरेटर बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे.” अलिमुद्दीन स्ट्रीट येथील स्थानिक रहिवासी असणाऱ्या २९ वर्षीय तौसिफ रहमानने गेले २८ दिवस वाटसरूंसाठी त्याचा फ्रिज घराबाहेर ठेवला आहे. तसेच तो दिवसाला ३० पेक्षा जास्त पॅक केलेल्या पाण्याच्या बाटल्या त्या फ्रिजमध्ये ठेवत आहे. या कडक उन्हात रस्त्यावरून जाणाऱ्यांना मोफत पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.
सोशल मीडिया स्टार किली पॉलवर अज्ञातांनी चाकूने केला हल्ला; इंस्टाग्रामवरून दिली घटनेची माहिती
तौसिफने सुरु केलेला हा उपक्रम इतका सुंदर आहे की इतर स्थानिकही यामध्ये हातभार लावू लागले आहेत. त्यांनी इतरांना पिण्यासाठी रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात केली. तर काहींनी पाणी भरण्यासाठी रिकाम्या बाटल्याही देऊ केल्या.