आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी झटपट हव्या असतात. अगदी माणसाकडूनदेखील आपण यंत्रासारखेच वेगवान काम करण्याची अपेक्षा ठेवतो. या ‘फास्ट अँड फ्युरिअस’च्या दुनियेत अगदी हळू हळू काम करणा-याची गणना तर गोगलगायीशीच होते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या पुण्याच्या बँक कॅशिअर महिलेचेही असेच झाले होते. जगातील सगळ्यात हळू काम करणारी महिला म्हणून त्यांची खिल्ली उडवली जात होती. अगदीच ‘स्लो मोशन मोड’ वर काम करणा-या या महिलेवर प्रत्येकांनी टीका टिप्पणी केली. तिच्यामुळे बँकेचे काम रखडते आहे, तिला कामावरून काढून टाका वगैरे वगैरे अशा अनेक अवहेलना त्यांच्या वाट्याला आल्या. पण जसे दिसते तसे नसते हे वारंवार ऐकून असलो तरी अनेकदा आपण जे दिसते त्याची शहानिशा न करताच त्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया देत असतो. त्यांच्याबाबतीही असेच काहीसे झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याच्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये काम करणा-या प्रेमलता शिंदे यांचा बँकेत संथगतीने काम करतानाचा व्हिडीओ एकाने सोशल मीडियावर अपलोड केला होता. जगातील सर्वाधिक वेगाने काम करणारी महिला’ अशी उपहासात्मक टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. आतापर्यंत २ लाख लोकांनी सोशल मीडियावर टाकलेला हा व्हिडिओ शेअर केला. १४ लाख लोकांनी तो पाहिला. त्यांच्यावर वाईटप्रकारे टीका टिप्पणीही केली पण व्हिडीओत दाखवलेले सत्य एकालाही पडताळून पाहावेसे वाटले नाही. सामाजिक कार्यकर्ते कुंदन श्रीवस्ताव यांनी जेव्हा या व्हिडिओमागचे सत्य जगासमोर आणले तेव्हा मात्र त्यांच्यावर टीका करणा-या प्रत्येकाची मान शरमेने खाली गेली. प्रेमलता यांना दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. एकदा अर्धांगवायूचा झटकाही त्यांना आला आहे त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या जलद गतीने त्या काम करू शकत नाही. अनेक महिन्यांची वैद्यकीय रजा घेऊन त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या आहेत. पुढच्या वर्षी २०१७ मध्ये त्या निवृत्त होत आहेत. निवृत्ती आधी त्यांना आपली सेवा पूर्ण करायची आहे आणि याच निष्ठेशी प्रामाणिक राहून त्या रोज बँकेत येऊन काम करतात. खरे तर त्यांच्या या जिद्दीचे कौतुक प्रत्येकाने करायला हवे होते पण नेटिझन्सने मात्र काही जाणून न घेता त्यांना लक्ष्य केले.