Heart Touching Video Viral : आयुष्यात आई-वडिलांचे स्थान कोणीही घेऊ शकत नाही. आई नऊ महिने शारीरिक, मानसिक त्रास सहन करीत मुलांना जन्म देते. लहानाचं मोठं होईपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. वडील आयुष्यभर काबाडकष्ट करून, त्यांची अनेक लहान-मोठी स्वप्नं पूर्ण करतात. आपण जे दु:ख भोगलं, ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून पायांतील चपला झिजवतात, मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी सतत विचार करतात. मग, हीच मुलं मोठी झाल्यावर आपलाही सांभाळ करतील याचा विचार करून ते जगत असतात. पण, ज्या मुलांना फुलांप्रमाणे जपलं, त्याच मुलांना जेव्हा आई-वडील संसारात अडथळा वाटू लागतात. अशा वेळी त्यांना थेट अनाश्रमाची वाट दाखवली जाते. पण, वृद्धाश्रमात सोडल्यानंतर त्या आई-वडिलांना किती दु:ख, यातना होत असतील याचा कधी विचार केला जातो का? सध्या सोशल मीडियावर एका वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

वृद्धाश्रमातील वृद्धांना चक्क मारहाण करून रस्त्यावर फेकले

वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाची असते. मात्र, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या एका वृद्धाश्रमातील वृद्धांना चक्क मारहाण करून रस्त्यावर फेकल्याचा निर्दयी प्रकार समोर आला आहे. हे दृश्य पाहून तुम्हीही म्हणाल असं दु:ख कोणाच्याही आई-बापाच्या वाट्याला येऊ नये.

कडक उन्हात त्या वृद्धांना रस्त्याच्या कडेला सोडून देण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हातात काठी घेऊन अनेक वृद्ध उन्हात रस्त्याच्या कडेला बसून मदतीची प्रतीक्षा करतायत. यावेळी आजूबाजूला अनेक लोक आणि पोलीसही दिसतायत. दरम्यान, व्हिडीओमध्ये नेमकी ही घटना काय याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील एका गावातील वृद्धाश्रमात २८ मार्चच्या रात्री ११ च्या सुमारास ५ ते ७ वृद्धांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर वृद्धाश्रमातील लोकांनी त्यांना अॅम्बुलन्समधून जतमधील एका भागात नेले आणि तेथे त्यांना अत्यंत निर्दयपणे सोडून गेले. दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओवर आता संताप व्यक्त केला आहे.

हा हृदयद्रावक व्हिडीओ @divya.mali.50767 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोक आता वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरनं लिहिले की, काहीही झालं तरी आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकू नका. दुसऱ्यानं लिहिलं की, या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. त्यांना असं का सोडलं याची चौकशी सरकारनं केली पाहिजे. तिसऱ्यानं लिहिलं की, आश्रम फक्त पैसे कमवायला खोलतात; गरिबांची सेवा करायला नाही.