सकाळी उठल्यावर तो शाळेसाठी तयार झाला खरा, अनेक महिन्यांनी शाळेत जात असल्याने त्याचा फोटोही त्याच्या पालकांनी आपल्या घराबाहेर काढला. मात्र पुन्हा शाळेत जाणे बहुदा त्याच्या नशिबातच नव्हते. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर शाळेत जायला निघालेल्या अमेरिकेतील ओहिओमधील पेयटेन वेस्ट या १३ वर्षांच्या मुलाचा अखेर प्राण गेला. पेयटेनचा जन्म झाला तेव्हापासूनच त्याच्या हृदयाचा केवळ उजवा भाग कार्यरत होता. त्याच्यावर नुकतीच हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
आपल्या नव्या हृदयाशी जुळवून घेत पेयटेन शस्त्रक्रियेच्या अशक्तपणातून बरा होत पाच महिन्यांनी शाळेसाठी निघाला होता. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार कारमधून शाळेला जात असताना त्याने आपल्या मोठ्या भावाला आपल्याला बरे वाटत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. दोन तास त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. हृदयप्रत्यारोपणानंतरचा त्याचा पाच महिन्यांचा काळ त्याच्या आयुष्यातील अतिशय उत्तम काळ होता असे त्याच्या पालकांनी सांगितले. या शस्त्रक्रियेमुळे आम्हाला पेयटेनसोबत इतका चांगला वेळ घालवता आला असे त्याचे वडिल कोरी वेस्ट यांनी सांगितले.
या घटनेमुळे पेयटेनची केवळ ओहीओमध्येच नाही तर जगभरात ‘वॉरियर हार्ट’ म्हणून ओळख निर्माण झाली. त्याच्या कुटुंबाला अर्थिक मदत करण्यासाठी स्थानिक स्तरावरील अनेक संस्थांनी पुढाकार घेतला. यानंतर ‘फॉरेवर अवर वॉरीयर’ अशा नावाने उपक्रमही सुरु करण्यात आले. फेसबुकवर यानिमित्ताने तयार करण्यात आलेल्या पेजला ६ हजारांहून अधिकांनी फॉलो केले. या पेजवर त्याच्या पालकांनी त्याच्या जन्मापासूनची गोष्ट शेअर केली आहे. ५ वर्षांचा होईपर्यंत पेयटेन याच्यावर ३ हृदयशस्त्रक्रिया झाल्या होत्या, असे त्याची आई मेलिसा हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बरे वाटत नसताना पेयटेनने फार कमी वेळा आपल्याकडे तक्रार केली असल्याचेही त्याच्या पालकांनी सांगितले. अशा परिस्थितीतही तो आनंदी राहून आम्हाला जोक्स सांगत राहायचा. हृदयरोपणातून बरा झाल्यानंतरही तो आनंदाने प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत होता. तो आपल्या कुत्र्यासोबत खेळायचा, फूटबॉल हे खेळ पहायचा. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्याचा जीवनप्रवास तिथेच संपला. तो गेल्यानंतर काही वेळाने त्याच्या कुटुंबाने त्याचे शाळेत जाताना काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.