सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही मजेशीर तर काही संतापजनक असतात. खरं तर अनेक लोक मुक्या प्राण्यांवर खूप प्रेम करतात मात्र काही लोक या मुक्या प्राण्यांवर खूप अत्याचार करतात. मागील काही दिवसांपासून प्राण्यांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जळगावमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आले आहे, जो पाहिल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. कारण एका व्यक्तीने भटक्या कुत्र्याचा क्रूर पद्धतीने बळी घेतला आहे. शिवाय या कुत्र्याची चूक एवढीच होती की त्याने ट्रॅक्टरची सीट खराब केली. ट्रॅक्टरची सीट खराब झाल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने कुत्र्याला अशी हृदयद्रावक शिक्षा दिली आहे ज्याचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्याने ट्रॅक्टरचे सीट कव्हर फाडल्यामुळे संतापलेल्या वृद्ध ट्रॅक्टर मालक संतापला आणि त्याने कुत्र्याला पकडून त्याच्या गळ्यात दोरी बांधली. त्यानंतर त्याच दोरीने कुत्र्याला ट्रॅक्टरला लटकवले. यावेळी कुत्र्याच्या गळ्याला फास लागल्याने त्याचा तडफडून मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे भयानक कृत्य त्या व्यक्तीने अनेक लोकांसमोर केलं. शिवाय तिथे उपस्थित असलेल्या अनेकांनी या व्यक्तीच्या कृतीवर नाराजी व्यक्त करत त्याला फटकारल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे. यावेळी एक व्यक्ती, “कुत्र्याला जिवंत फाशी दिली हे पाप कुठं फेडशील हा पापी माणूस आहे” असं म्हणत असल्याचंही ऐकू येत आहे.
संतापजनक व्हिडिओ व्हायरल –
या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती काळ्या कुत्र्याला ट्रॅक्टरला लटकवताना दिसत आहे. कुत्रा काही वेळाने काहीच हालचाल करत नसल्याचं दिसत आहे, त्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे. तर येथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता. जो ‘फाइट अगेन्स्ट अॅनिमल क्रुएल्टी’ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन पोस्ट करण्यात आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेटकरी संतापले –
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे, “अशा लोकांविरुद्ध कोणी काही करत नाही. दोन दिवस बोलून सगळे गप्प होतात. त्यामुळे अशा लोकांची हिंमत वाढते.” तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, “या माणसाला अजूनही लाज वाटत नाही. त्याने किती मोठी चूक केली आहे हे त्याला समजत नाही.”