वर्षभरापूर्वी तिनं एका मुलाला वाचवलं होतं. २ वर्षांचा मुलगा भूक आणि उपासमारीनं मरणासन्न अवस्थेत होता. या मुलाच्या अंगात दृष्ट आत्मे आहेत या अंद्धश्रद्धेपोटी त्याला कुटुंबियांनी मरणासाठी रस्त्यावर सोडून दिलं होतं. डॅनिश समाजसेविका लोवेन ही या गावात आली होती आणि तिनं जे पाहिलं ते सारं भयंकर होतं. एवढ्या लहान मुलाला आई वडिल अंधश्रद्धेपोटी मरणासाठी कसं सोडून देऊ शकतात? या विचारानं लोवेन अस्वस्थ झाली. जगात माणूसकीचा अंत झालाय असंच तिला वाटू लागलं. या मुलाला लोवेनने उचलले आणि घेऊन आली आपल्या आश्रमात. या मुलाची जगण्याची आशा अनेकांनी सोडली होती. पण जगभरातून मदत मिळवून तिने त्याच्यावर उपचार करुन घेतले. आजचा क्षण लोवेनसाठी खास होता कारण आज पहिल्यांदा हा मुलगा शाळेत गेला. लोवेनने आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्याचा फोटो शेअर केला.
वाचा : फॅशन डिझायनिंगमधले करिअर सोडून ‘ती’ दाखल झाली पोलीस दलात
समाजसेवा करत लोवेन ही नायजेरियातल्या अनेक ठिकाणी फिरली. आई वडिलांनी अंधश्रद्धेपोटी रस्त्यात सोडून दिलेली अशी एक दोन नाही तर कितीतरी मुलं आहेत हे लोवेनला या भागात फिरताना लक्षात आले होते. त्यातलाच हा एक मुलगा होता. नायजेरितल्या एका खेड्यात फिरताना तिला रस्त्यात तो दिसला होता. भूक, तहानेने तो आक्रोश करत होता. एव्हाना अश्रूही सुकले होते. अशक्तपणाने तोंडातून आवाजही फुटत नव्हता. या मुलाला पाहून लोवेन अस्वस्थ झाली. यांच्या शरीरावर झालेल्या जखमेत किडे पडले होते. गावातील कोणीही त्याच्याकडे पाहायला तयार नव्हते. अशा अवस्थेत लोवेनने या मुलाला आपल्या सोबत नेले. इतर समाजसेवकांच्या मदतीने त्याची जखम साफ करून त्याच्यावर योग्य ते उपाचार केले. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांनी या मुलाला जीवनदान दिले होते. जेव्हा लोवेनला हा मुलगा सापडला होता तेव्हा लोवेनने त्याचा फेसबुकवर एक फोटो शेअर केला होता. दगडालाही पाझर फुटला असता असा हा फोटो होता.
वाचा : २६ व्या वर्षी अब्जाधीश!!
हा फोटो वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर जगभरातून लोवेनला या मुलाच्या वैद्यकिय खर्चासाठी आर्थिक मदत मिळाली. हा मुलगा जगणार नाही असं अनेकांना वाटत होतं पण आशेवरच तर जग टिकून आहे हे लोवेनला माहिती होतं. तिने त्याच्या जगण्याची आशा कधीच सोडली नाही. हे मुलं तिने जगवून दाखवलंच. आज बरोबर वर्षभराने लोवेनने त्याचा फोटो फेसबुकवर शेअर केला. तो शाळेत जातानाचा फोटो होता. एक वर्षांपूर्वी लोवेन मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या त्याच कुपोषित मुलाला पाणी भरवत होती. तो जगेल की नाही याच्या वेदना तिच्या चेह-यावर होत्या. आजही याच मुलाला ती पाणी भरवत होती. पण आता तिच्या चेह-यावर समाधान होतं. समाधान त्याला जगवल्याचं आणि समाधान त्याचं भविष्य घडवल्याचं.