Nalasopara station Viral video: मुंबई रेल्वे प्रशासनानं ३१ मे ते २ जून या काळात मेगाब्लॉक जाहिर केला होता. ठाणे स्थानकात ६३ तास मेगाब्लॉक होता, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा ३६ तासांचा मेगाब्लॉक होता. या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिनही दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण ९५६ लोकल रद्द केल्या होत्या. तर या तीन दिवसांत एकूण ७२ लांब पल्यांच्या गाड्या देखील रद्द केलेल्या. यामुळे रेल्वेचा प्रवास आणखी जलद गतीनं होईल अशी अपेक्षा होती. पण घडलं भलतंच. उलट मेगा ब्लॉगनंतर पहिल्याच दिवशी मुंबईकरांची अवस्था पहिल्यापेक्षा जास्त बिकट झालेली दिसतेय. कारण कालपर्यंत मध्यरेल्वे मार्गावर ट्रेन उशीरा पळत होत्या पण आज तर पश्चिम रेल्वे देखील पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसतेय. याच पार्श्चभूमीवर नालासोपारा या स्टेशनवरील गर्दीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
बोरिवली रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटली
नालासोपारा हे एक असं रेल्वे स्टेशन आहे, जिथे दररोज गडबड गोंधळ हा पाहायला मिळतोच. कधी रेल्वे उशीरा आली म्हणून लोक मारामारी करतात, तर कधी लोक रेल रोको आंदोलन करतात, कधी विरूद्ध दिशेने डब्यामध्ये चढतात. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या रेल्वेच्या खोळंब्यामूळे हजारो प्रवासी नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकात ताटकळत उभे होते. ट्रेनच्या त्रासामुळे अनेक चाकारमान्यांना कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोरिवली रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. २५ ते ३० मिनिटांनी ट्रेन उशिराने धावत होत्या. त्यामुळे नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.
नालासोपारा, विरार रेल्वे स्थानकात जीव गुदमरेल एवढी गर्दी
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जिथे नजर जाईल तिथे प्रवाशांची गर्दी दिसत आहे. सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभंही राहता येत नाहीये इतकी गर्दी आहे. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आणखीच त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. एवढंच नाहीतर रेल्वे स्टेशनच्या बाहेरही तुफान गर्दी पाहायला मिळाली. तुम्ही पाहू शकता, गर्दी इतकी तुफान आहे की यामध्ये चेंगरा-चेंगरीही होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यात प्रवाशांना एकच प्रश्न पडलाय की एवढ्या तुफान गर्दीत ट्रेनमध्ये चढायचं तरी कसं?
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @rushikesh_agre_ नावाच्या एक्स एकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.